
स्थैर्य, 1 फेब्रुवारी, सातारा : विविध कारणांनी आजपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षभरात मुदत संपलेल्या 145 आणि 2026 मध्ये मुदत संपणार्या 867 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक होईपर्यंत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जात आहेत. जिल्ह्यातील 867 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. येत्या चार दिवसांत ही कार्यवाही जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून होणार आहे.
ग्रामपंचायतींचा कारभार सरपंच व सदस्य पाहतात. हा कारभार पाच वर्षे चालतो. मुदत संपल्यानंतर पुन्हा निवडणूक होऊन सदस्य व सरपंचनिवड होईपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती केली जाते. या प्रशासकाला सरपंच आणि सदस्यांचे सर्व अधिकार असतात. त्यामुळे सदस्य, पदाधिकारी नसतानाही ग्रामपंचायतीचा कारभार निरंतरपणे सुरू राहतो. जनतेची कामे आडून राहात नाहीत; पण गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. 2025 मध्ये मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायती आहेत.
मध्यंतरी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरून 2026 पर्यंत मुदत संपणार्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याची सूचना न्यायालयाने केली त्यानुसार ग्राम विभागाच्या आहे. अतिरिक्त सचिवांनी आदेश काढून सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना तातडीने प्रशासक नेमण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकार्यांकडून प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले जात आहेत. जिल्ह्यात 2026 पर्यंत मुदत संपणार्या 867 ग्रामपंचायती आहेत. यावर आता प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. येत्या चार दिवसांत ही कार्यवाही सुरू होणार आहे
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासकीय अधिकार्याची नियुक्ती करतात. यामध्ये प्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकार्यांचा समावेश असतो. या प्रशासकांच्या माध्यमातून गावचा कारभार चालवला जातो. जोपर्यंत नवीन सरपंच व सदस्य निवडून येत नाहीत, तोपर्यंत प्रशासक कामकाज पाहणार आहेत. आता जिल्ह्यातील 867 पैकी किती ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जातात, याची उत्सुकता आहे.

