राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठा निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना मिळणार ४८३ कोटींचा निधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने जल जीवन मिशनअंतर्गत ४८३.१८ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला असून टँकरमुक्तीसाठी विशेष तरतूद केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २१ नोव्हेंबर : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी राज्य सरकारने जल जीवन मिशनअंतर्गत ४८३.१८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. यामध्ये टँकरमुक्त गावांसाठी ८३.१८ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली असून, ७५ टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झालेल्या योजनांची उर्वरित कामे या निधीतून पूर्ण केली जाणार आहेत.

टँकरमुक्त गावांसाठी विशेष प्राधान्य

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २० नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, मंजूर निधी बेलापूर येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनकडे वितरित केला जाईल. एकूण निधीपैकी ४०० कोटी रुपये सर्वसाधारण घटकांतर्गत योजनांसाठी, तर ८३.१८ कोटी रुपये टँकरमुक्तीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्या योजनांमुळे गावांमधील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करता येईल किंवा टँकरच्या फेऱ्या कमी होतील, अशा कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ

या विशेष तरतुदीचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यांना मोठा लाभ होणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील चांदवड, सिन्नर, बागलाण, देवळा आणि सुरगाणा तालुक्यांचाही यात समावेश आहे. याशिवाय नंदुरबार, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर, अहमदनगर, सातारा, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील रखडलेल्या योजनांनाही या निधीतून गती मिळणार आहे.

कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

जल जीवन मिशनमध्ये केंद्र आणि राज्याचा वित्तीय हिस्सा समप्रमाणात असला, तरी सुधारणात्मक पुनर्जोडणी योजनांसाठी शंभर टक्के निधी राज्याच्या स्वनिधीतून देण्यास मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. हा मंजूर निधी तातडीने खर्च करून योजनांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसत असून हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!