दैनिक स्थैर्य | दि. 09 मार्च 2024 | फलटण | ‘‘कार्यकर्ते, नेते यांनी सत्याकडे जाण्याऐवजी सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. जातीयवादी, धर्मांध शक्तीला रोखायचे असेल तर ‘सत्या’कडे जाण्याचा आग्रह सर्वांनीच धरला पाहिजे; तरच काँग्रेस पक्षाला नव्याने संजीवनी मिळू शकेल’’, असे मत राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.इंद्रजित मोहिते यांनी येथील पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना व्यक्त केले.
भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष असलेले डॉ.इंद्रजित मोहिते फलटणच्या राजघराण्यातील विवाह सोहळ्यासाठी येथे आले असता त्यांनी ‘लोकजागर’ वृत्तपत्र व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली; त्यावेळी उपस्थित पत्रकारांसमवेत झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांचे ज्येष्ठ स्नेही, पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, ‘लोकजागर’चे संपादक रोहित वाकडे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पत्रकार यशवंत खलाटे, बापूराव जगताप, प्रसन्न रुद्रभटे, अमर शेंडे, मनिष निंबाळकर, भिवा जगताप उपस्थित होते.
‘‘काँग्रेस पक्षाचे भवितव्य नव्या पिढीच्या हातात आहे. पण तरुण कार्यकर्त्यांपर्यंत नेतेमंडळींनी पोचले पाहिजे. एकटे राहुल गांधी पदयात्रेने जनतेत जाताहेत. पण पक्षाच्या अन्य मोठ्या नेत्यांनीसुद्धा काँग्रेसचा विचार घरोघरी पोचविण्यासाठक्ष आपापल्या भागातील तरुण पिढीला घेऊन संपर्क अभियान राबविले पाहिजे. पक्षातले काही बुजुर्ग नेते हम करे सो कायदा याप्रमाणे वागत आहेत. अशा नेत्यांनी पक्षातील सर्वच जुन्या नव्यांना बरोबर घेतले पाहिजे’’, अशी अपेक्षाही डॉ.इंद्रजित मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली.
‘‘स्व.यशवंतराव मोहिते यांच्यामुळे पूर्वी काँग्रेसची चिंतन शिबिरे कार्यकर्त्यांसाठी (नेत्यांसाठी नव्हे) होत होती त्यातून वैचारिक बैठक असलेेले कार्यकर्ते तयार होत होते. तशी शिबिरे पुन्हा सुरु झाली पाहिजेत’’, असेही मत डॉ.इंद्रजित मोहिते यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे डॉ.इंद्रजित मोहिते यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी स्वागत केले. तसेच ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांचा अमृत महोत्सवानिमित्त डॉ.इंद्रजित मोहिते यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.