स्थैर्य, सातारा, दि.०२: उंब्रज परिसरात मोठी दुखापत, गर्दी-मारामारी, शिवीगाळ, दमदाटी करणार्या व खुनाचा प्रयत्न करणार्या सातजणांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, टोळीप्रमुख विशाल अशोक दुटाळ वय 24, किरण आनंदराव पवार वय 28, अविनाश राजेंद्र पवार वय 20, आशितोष गणेश संकपाळ वय 20, सर्व.रा.अंधारवाडी. ता. कराड, जि.सातारा यांना पूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुका व रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुका हद्दीतून 1 वर्षे (एक वर्षे) या कालावधी करीता हद्दपार केले आहे. तसेच उंब्रज परिसरात खून गदीर्र्-मारामारी, आदेशाचा भंग करणारे टोळीचा प्रमुख पवन उर्फ प्रवीण शामराव साळुंखे वय 34 वर्ष रा. नवीन कवठे, ता. कराड व राजेंद्र भिकोबा मारुती मसुगडे वय 35 वर्षे रा. नवीन कवठे, ता. कराड व कैलास तात्याबा चव्हाण वय 30, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड यांना पुर्ण सातारा जिल्हा, व सांगली जिल्हयातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुका हद्दीतून 01 वर्षे (एक वर्षे) या कालावधीकरीता हद्दपार केले आहे.
संबंधित टाळ्यांतील इसमांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांचेवर कडक कारवाई करण्याकरिता मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून वरील दोन्ही टोळीतील 7 इसमांना हद्दपार करणे बाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता.
या कामी प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उंब्रज पोलीस ठाणेचे स. पो.नि. श्री. अजय गोरड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला.