स्थैर्य, वाई, दि.७ : महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर महिनोंमहिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.अशा अनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांच्या बंद वाहनावरील कारवाईचे नागरिकांकडून समर्थन होत आहे.
पालिकेने मध्यवर्ती ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारले आहे. हे वाहनतळही पर्यटकांच्या वाहनांना अपुरे पडत आहे. या वाहनतळाचा काही नागरिकांनी गैरफायदा उठवण्याच्या उद्देशाने आपली भंगार व नादुरुस्त टाकाऊ वाहने या वाहनतळावर आणून उभी केली आहेत. ही वाहने गेली अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. या वाहनांमुळे पर्यटकांची गैरसोय होत असून, पर्यटकांना आपली वाहने अन्यत्र उभी करावी लागतात आहेत.यामुळे शहरात वाहतूक कोंडी होते. याबाबत काही नागरिकांनी मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दाखल घेत मुख्याधिकारी पाटील यांनी अशा वाहनांवर कारवाईचा निर्णय घेतला.