स्थैर्य, फलटण : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत स्तरावर कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळत आहेत. सद्यःस्थितीत आपल्या जिल्हयात कोरोना विषाणु बाधित रुग्णांमध्ये मोठया प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. यापुढील काळात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षता घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुचे संसर्गात अधिक वाढु होवु न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सदर बाधित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्हयात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन अत्यावश्यक सेवेसाठी फलटणचे निकोप हॉस्पिटल हे हॉस्पिटल कोव्हीड १९ बाधित रुग्णांवर उपचार करणेसाठी पुढील आदेश होईपर्यत अधिग्रहित करण्यात येत आहे. असे आदेश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केलेले आहेत. सदरचा आदेश सातारचे जिल्हाधिकारी यांनी राजकीय दबावातूनच घेतलेला आहे, असे मत नगसेवक अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केलेले आहे.
वास्तविक पाहता जिल्हाधिकारी यांनी कोणाच्याही राजकीय दबावाला न पडता काम करणे आवश्यक आहे. जर कोरोनासाठी फलटण मध्ये गंभीर परिस्थिती असेल व हॉस्पिटल अधिग्रहण करणे गरजेचे असेल तर निकोप हॉस्पिटल सोबत इतर खाजगी हॉस्पिटल अधिग्रहण करणे गरजेचे आहे. फलटण शहराच्या मध्यवर्ती असलेले लाईफलाईन हॉस्पिटल सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांनी अधिग्रहण करणे गरजेचे होते. सध्या सरकारी रुग्णालयात रुग्णांना कोणत्याही सेवा चांगल्या दर्जाच्या मिळत नाहीत त्या मुळे फलटण मधील निकोप हॉस्पिटल समवेत लाईफलाईन हॉस्पिटल सुद्धा अधिग्रहण करणे आवश्यक होते, असेही नगसेवक शहा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.