दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२४ | फलटण |
जर्शी गाईंच्या चोरीप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांनी लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी केलेल्या दोन गाई एकूण किंमत १,०८,०००/- रूपये व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन रुपये ४,२०,०००/- किमतीचे असा एकूण ५,२८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण तानाजी येळे (वय २४, रा. घाडगेवाडी, ता. फलटण) व सचिन साहेबराव येळे (वय ३७, रा. येळेवस्ती, घाडगेवाडी, ता. फलटण) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर्शी गाईंच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरून लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशील भोसले, सहा. पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी या घडणार्या गुन्ह्यांबाबत गोपनीय खबर्यांमार्फत माहिती मिळवून या गुन्ह्यांतील आरोपी निश्चित केले.
त्यानुसार दि. १४ मार्च २०२४ रोजी यातील आरोपी हा बिबी, ता. फलटण परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने व त्याच्या एका साथीदाराने मिळून लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाडगेवाडी (ता. फलटण) येथील गाई चोरीचे एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचेकडून चोरी केलेल्या दोन गाई एकूण किंमत १,०८,०००/- रूपये व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन रुपये ४,२०,०००/- किमतीचे असा एकूण ५,२८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींनी लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि सुशील भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह. संतोष नाळे, सर्जेराव सूळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, चंद्रकांत काकडे, सिध्देश्वर वाघमोडे यांनी केला असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.