बाल विज्ञान काँग्रेसमधून निर्माण होतील उद्याचे अब्दुल कलाम – डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । नागपूर । भारतात विविध शोध लावणाऱ्या प्रतिभावंत बालकांची कमी नाही. विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. या बाल विज्ञान काँग्रेस मधूनच उद्याचे अब्दुल कलाम निर्माण होतील, असा आशावाद भारतीय विज्ञान काँग्रेसच्या महासचिव डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी व्यक्त केला.

बाल विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला.  अध्यक्षस्थानी डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना होत्या तर नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक उमेश कुमार रस्तोगी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राज कुमार जोशी, बाल विज्ञान काँग्रेसच्या शैक्षणिक समितीचे अध्यक्ष डॉ. ललीतकुमार शर्मा, नागपूर विद्यापीठाचे आंतरशाखीय प्रमुख डॉ. प्रशांत कडू, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॅा.एस.रामकृष्णन, डॅा.अनुपकुमार जैन, डॅा.सुजित बॅनर्जी, संयोजक डॅा.निशिकांत राऊत याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. उमेशकुमार रस्तोगी म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी सादर केलेल्या संशोधन व कल्पना पाहुन आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित आहे. ललीत शर्मा म्हणाले की, सामान्यांपेक्षा वेगळा विचार करून व जग बदलेल असे शोध लावा.

प्रशांत कडू यांनी प्रास्ताविकेतून बाल विज्ञान काँग्रेसच्या आयोजनाची माहिती दिली.

बाल विज्ञान काँग्रेसमध्ये देशभरातील 29 राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांना त्यांचे संशोधन दाखवण्याची आणि वैज्ञानिक समुदायातील त्यांच्या समवयस्कांशी संलग्न होण्याची संधी मिळाली, असे संयोजक डॉ. निशीकांत राऊत यांनी सांगितले संचालन योगेश्वरी भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमाला बालवैज्ञानिक, विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!