खटाव तालुक्यातील युवकाचा पुण्यात दगडाने ठेचून खून

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । खटाव । मुळचा खटाव तालुक्यातील युवकाचा व पुणे शहरात पीएमपीएल चालक असलेल्या युवकाचा दगडाने खून झाल्याने खळबळ उडाली आहे. उरुळी देवाची येथील बाजारेमळा परिसरात रविवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला. गौतम मच्छिंद्र साळुंखे (सध्या रा. भेकराईनगर मुळ रा. कान्हरवाडी, ता.खटाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साळुंखे हे पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपीएल) बदली रोजंदारी चालक म्हणून काम करत होते. त्यांची नियुक्ती स्वारगेट डेपो येथे होती. शनिवारी दिवसभर ते कामावर होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ड्यूटी संपल्यानंतर त्यांनी स्वारगेट डेपोमध्ये गाडी जमा केली. यानंतर ते घरी जाण्यासाठी डेपोबाहेर पडले. मात्र, रात्री उशीरापर्यंत ते घरी पोहचले नाहीत. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी विचारपूस करत त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, रविवारी दुपारी उरुळी देवाची बाजारेमळा परिसरात स्थानिक नागरिकांना मृतदेह आढळून आला. याबाबची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. यानंतर तात्काळ युनिट सहाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. आजूबाजूला शोध घेतला असता तेथे पीएमपीचा बॅच मिळाला. त्यावरून गौतम यांची ओळख पटली. याबाबत लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
गौतम यांचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याला सव्वा वर्षाची मुलगी आहे. ते आपल्या सासर्‍यांकडेच राहात होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!