उरमोडी जलाशयात मित्रांसोबत गेलेला तरुण बुडाला

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२६ | सातारा |
उरमोडी धरणाच्या जलाशयात सोमवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला एक तरुण बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम व पोलिसांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली.

परळी (ता. सातारा) गावच्या हद्दीत असलेल्या उरमोडी धरण जलाशयाजवळील एका हॉटेलमध्ये काही युवक सोमवारी दुपारी जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर त्यांच्यापैकी ओंकार प्रमोद कदम ऊर्फ मयूर (वय ३२, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) हा जलाशयात पोहण्यासाठी उतरला. मात्र, बराच वेळ होऊनही तो पाण्याबाहेर न आल्याने त्याच्यासोबत असलेल्या युवकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.

या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना देण्यात आली. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीमचे जवान तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जलाशय परिसरात शोधकार्य सुरू केले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अंधार पडला. त्यातच सोसाट्याचा वारा असल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. दुसर्‍या दिवशी मंगळवारी शोधमोहीम राबविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!