ट्रॅक्टर ट्रॉलीतील उसाच्या मोळीचा धक्का लागून चाकाखाली सापडल्याने दुचाकीचालक ठार


दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मांगोबामाळ विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण – राजाळे रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॉलीतील मोळीचा धक्का लागून ट्रॅटरच्या चाकाखाली सापडल्याने एकजण ठार तर एकजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अज्ञात ट्रॅटरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल शिवाजी वाघमोडे (वय ३८, रा. राजाळे, ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर आयुष संतोष बुधावले (वय १९, रा. राजाळे) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण ते राजाळे रस्त्यावर मांगोबामाळ विडणी गावच्या हद्दीत नवीन बांधकाम चाललेल्या पाण्याच्या टाकीजवळून दुचाकीवरून आयुष संतोष बुधावले (वय १९, रा. राजाळे. ता. फलटण) आणि राहुल वाघमोडे हे दोघे जात होते. पुढे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीतील एक मोळी ट्रॉलीचे बाहेरील बाजूस आलेली होती आणि याकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक जोराने ट्रॅक्टर ट्रॉली चालवित होता. त्याचवेळी त्याच्या मोटारसायकलला उसाने भरलेल्या ट्रॉलीतील मोळीचा धक्का लागून मोटारसायकल रस्त्यावर खाली पडली. त्यामध्ये मोटरसायकल चालक राहुल वाघमोडे हे ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला आयुष बुधावले याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला.

याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार ओंबासे हे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!