कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । मुंबई । नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्यासह नागपूर कॅन्सर रुग्णालयासाठी काम करणारे संबंधित उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, या इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी सुमारे 76.10 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इन्सिट्यूट उभारणी करीत असताना बांधकाम कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, यामध्ये कोणत्या सुविधा असणार आहेत याबाबतची माहिती वैद्यकीय संचालक यांनी घ्यावी. बांधकाम करीत असताना यंत्रसामग्री, सोयी सुविधा आणि मनुष्यबळ निर्मिती कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याबाबतची माहितीही देण्यात यावी. तसेच औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय यांनी कर्करोग रुग्णालय बांधताना टाटा स्मृती कर्क रुग्णालयाची मदत घेतली असून या इन्स्टिट्यूट उभारणीसाठीही मदत घेण्यात यावी.

निविदा प्रक्रिया ते काम पूर्ण होईपर्यंतचा कालावधी याचा समावेश करुन बांधकामाबाबतचा कालबद्ध आराखडा तयार करण्यात यावा. रुग्णालय ठिकाणी शांततेची आवश्यकता असल्याने साऊंड प्रूफ यंत्रणा कशी बसविता येईल याबाबतही इन्स्टिट्यूट उभारणीदरम्यान विचार करण्यात यावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!