भाडळीत रणरागिणींचा एल्गार! जयकुमार शिंदे व विकास नाळेंच्या प्रचारासाठी महिला पदाधिकारी मैदानात; घराघरात पोहोचले खासदार गटाचे विचार


स्थैर्य, फलटण, दि. 31 जानेवारी : कोळकी जिल्हा परिषद गटातील राजकीय रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. भाडळी बुद्रुक व भाडळी खुर्द या दोन्ही गावांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी झंझावाती प्रचार दौरा करत भाजपाचे उमेदवार जयकुमार शिंदे आणि विकास नाळे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महिला प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता.

घराघरात उमटतोय ‘कमळा’चा आवाज

भाडळी बुद्रुक आणि खुर्द येथील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून महिला पदाधिकाऱ्यांनी जयकुमार शिंदे यांच्या सात वर्षांच्या संघटनात्मक कार्याची आणि विकास नाळे यांच्या कोळकी ग्रामपंचायतीमधील १५-२० वर्षांच्या विकासकामांची माहिती महिला मतदारांना दिली. “जयकुमार शिंदे हे केवळ जिल्ह्याचे नेते नाहीत, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवणारे विश्वासू दुवा आहेत,” अशा शब्दांत महिलांनी त्यांचे समर्थन केले.

भावनिक राजकारणाला विकासकामांनी उत्तर

प्रचारादरम्यान बोलताना महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोळकी गटाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले जयकुमार शिंदे आणि तळागाळातील प्रश्नांसाठी भांडणारे विकास नाळे यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. विरोधक केवळ नात्यागोत्याचे आणि भावनिक राजकारण करत आहेत, मात्र भाडळीची जनता यावेळी विकासालाच मतदान करेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

विरोधकांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष, विकासावर लक्ष

कोळकी जिल्हा परिषद गटात सह्याद्री चिमणराव कदम आणि पंचायत समिती गणात डॉ. अशोक नाळे यांचे आव्हान समोर असले, तरी भाजपाच्या या महिला आघाडीने गावागावात घेतलेल्या भेटीगाठींमुळे वातावरण पूर्णपणे भाजपाच्या बाजूने झुकले आहे. विकास नाळे यांची ‘हाडाचा कार्यकर्ता’ ही प्रतिमा आणि जयकुमार शिंदे यांचा श्रीराम बझारच्या माध्यमातून असलेला जनसंपर्क भाजपासाठी जमेची बाजू ठरत आहे.

या प्रचार दौऱ्यात भाडळी परिसरातील स्थानिक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. महिलांच्या या उस्फुर्त प्रतिसादामुळे जयकुमार शिंदे आणि विकास नाळे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.


Back to top button
Don`t copy text!