
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । शिव पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या ऐतिहासिक प्रतापगडांवर विविध विकास कामांसाठी 200 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, अजिंक्यतारा किल्यांसाठी 100 कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शिवप्रतापदिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून, यंदा भव्य लेझर शो सह सोहळा साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन सोहळा उद्या (मंगळवार) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते.
जयवंशी म्हणाले,‘‘अजिंक्यतारा व प्रतापगडाच्या सुशोभीकरणासाठी लवकरच आराखडा सादर केला जाणार आहे. गडांवर नागरिकांसाठी ऐतिहसिक माहिती व साहित्य जतन करावे यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार केला जाणार आहे. दरम्यान, यंदाच्या शिवप्रतापदिनाच्या सोहळ्यात पहाटे साडेसहा वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या हस्ते भवानी मातेला अभिषेक व पुजा करण्यात येणार आहे. त्यानंतर साडे सात वाजता भवानी मातेला पोशाख चढविण्यात येणार आहे. साडे आठ ते पावणे नऊ या वेळेत भवानी माता मंदिरासमोर ध्वजारोहण केले जाणार आहे. पावणे नऊ ते साडे नऊ या वेळेत मिरवणुक सोहळा, झेंडावंदन, ढोल पथक व शालेय मुलांचे विविध प्रात्यक्षिक सादर होणार आहेत. त्यानंतर साडे दहा ते साडे अकरा या कालावधित ध्वजारोहण, भवानी मातेची आरती होणार असून, साडे अकरा ते साडे बारा या वेळेत मान्यवरांचे सत्कार व मनोगत होणार आहे. तसेच साडे बारा ते दोन या वेळेत शाळेच्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दांडपट्टा व मर्दानी खेळ, पोवाड्यांचे सादरीकरण होणार आहे.‘‘
या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे आमदार उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री करणार आरती
प्रतापगडावर सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. पावणे अकरा ते अकरा या वेळेत भवानी मातेची आरती केली जाणार असून, सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.