दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगाव (ता. फलटण) येथील जितेंद्र विलास काळे यांचे घर संशयित सहा आरोपींनी जाळून घरातील ५० हजार रूपये रोख व कपाटातील १९ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केल्याची फिर्याद काळे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या जाळपोळीत काळे यांचे घरातील सर्व सामान जळून खाक झाले असून त्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून जॉनी नंदू भोसले, सागर नंदू भोसले, हिरा शर्करा पवार, किरण पिसुरड्या शिंदे, शायर पाग्या भोसले, वर्धमान आरोग्य शिंदे (सर्व राहणार साखरवाडी, तालुका फलटण) अशी आरोपींची नावे आहेत.
या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ०४ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जितेंद्र विलास काळे हे त्यांच्या पत्नीसह बाहेरगावी गेले असताना त्यांचे घर जळाल्याची माहिती त्यांना परत गावी येताना समजली. ते खामगाव येथे घरी पोहोचले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता व कुलूप तुटलेले होते. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे, रग व घरातील इतर वस्तू जळलेल्या दिसल्या. तसेच कपाटामध्ये असलेली १९ ग्रॅमची सोन्याची चेन व ५० हजार रुपये रोख रक्कम दिसली नाही. या जाळपोळ व चोरीप्रकरणी त्यांनी वरील सहा आरोपींवर संशय व्यक्त केला असून यापूर्वी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी काळे यांना ‘तक्रार मागे घे, नाहीतर तुझे घरदार जाळून टाकीन’, अशी धमकी दिली होती, असे काळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेचा अधिक तपास सपोनि हजारे करत आहेत.