स्थैर्य, दि.१: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या भिंतीच्या मधोमध लोखंडी शिडीत अडकलेल्या जवळपास 9 फुटांच्या अजगराला अत्यंत अडचणीच्या ठिकाणाहून सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी बाहेर काढून जीवदान दिले. त्यानंतर वन विभागातील अधिकाऱयांच्या उपस्थितीत या अजगराला निर्जनस्थळी जंगलात सोडून देण्यात आले.
कोयना धरण व्यवस्थापनातील कर्मचारी नेहमीप्रमाणे कोयना धरणाची पाणीपातळी पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी धरणाच्या भिंतीच्या मधोमध पाण्याची पातळी मोजण्यासाठी असलेल्या मोजपट्टीलगत लोखंडी अँगलच्या शिडीला भलेमोठे अजगर वेटोळे घालून अडकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱयांना दिल्यानंतर त्यांनी कोयना वन्यजीवचे वनरक्षक अतुल खोत यांच्याशी संपर्क साधला. खोत यांनी तत्काळ महाराष्ट्र ऍनिमल असोसिएशनचे अध्यक्ष, सर्पमित्र विकास माने यांना पाचारण केले. ते आपले साथीदार अश्वजित जाधव यांच्यासोबत लगेच कोयना धरणाच्या भिंतीवर पोहोचले. हे अजगर धरणातील भिंतीवरून खालील पाण्याच्या बाजूला असल्याने तिथपर्यंत पोहोचणे व अजगराची सुटका करणे अत्यंत कठीण काम होते.
धरणातील पाण्यात लोखंडी शिडीवरून जाऊन एका हाताने शिडी पकडून अजगराला बाहेर काढणे ही तारेवरची कसरत होती. मात्र, सर्पमित्र विकास माने व अश्वजित जाधव यांनी मोठे धाडस करून दोघेही साप पकडण्याचा चिमटा घेऊन शिडीवरून पाण्यात उतरले. साप पकडण्याच्या चिमटय़ाच्या साहाय्याने सुमारे तासभर चाललेल्या धडपडीनंतर त्या अजगरास बाहेर काढण्यात त्यांना यश आले. अजगरास बाहेर काढल्यानंतर त्याला वन विभागाच्या अधिकाऱयांच्या उपस्थित निर्जनस्थळी जंगलात सोडून देण्यात आले.