एककल्ली पण दिलदार माणूस : बापूराव देशपांडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.०९: फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश उर्फ बापूराव देशपांडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून आठवणींना उजाळा…

फलटणमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरु करण्यासाठी मी 1991 मध्ये प्रयत्न सुरु केला. त्यावेळी पुणे मसापचे अध्यक्ष कै.प्राचार्य जोगळेकर होते व प्रख्यात साहित्यिक, कवि कै.रविंद्र भट प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी मान्यता दिली आणि मग फलटणमध्ये सभासद नोंदणी सुरु केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य वि.अ.शेख व पर्यवेक्षक सतीश पटवर्धन, प्रा.डी.डी.रणवरे यांनी सहकार्य केले. या कामानिमित्त मी एकदा शेख सरांच्याकडे गेलो असता त्यांनी मला एका सडसडीत बांध्याच्या, चष्म्यातल्या भेदक डोळ्यांनी रोखून बघणार्‍या अशा एका शिक्षकाची ओळख करुन दिली व ‘‘यांना आपल्या मसाप शाखेत घ्या’’, असे सांगितले. ते होते व्यंकटेश उर्फ बापूराव देशपांडे. त्यांच्या वडिलांची कै.नारायण धोंडू देशपांडे यांची माझी तशी ओळख होती; ती पत्रकार संघाच्या कामातून माजी आमदार व पत्रकारांचे नेते, ‘शिवसंदेश’चे संपादक हरिभाऊ निंबाळकर यांच्यामुळे. कारण कै.नारायण देशपांडे हे तरडगाव येथून दैनिक ऐक्यसाठी बातमीदारी करीत होते आणि वृत्तपत्र एजंटही होते. सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा मी सरचिटणीस असताना कै.नारायण देशपांडे यांचा सहवास विविध कार्यक्रमातून व संघटनेच्या कामातून येत होता.

बापूराव देशपांडे हे ध्येयवादी विचाराचे व स्पष्ट विचारसरणीचे होते. त्यामुळे काही जणांना ते थोडेसे फटकळ वाटायचे. पण बापूराव कोणत्याही चर्चेत आपल्या मतावर ठाम असायचे. त्यांची शिक्षण क्षेत्रातील सेवा कोकणातून हर्णे व दाभोळ (ता.दापोली, जि.रत्नागिरी) येथून झाली. म्हणून त्यांच्या माझ्या मैत्रीत ‘कोकण’ हा समान धागा होता. मी माझ्या सहकार्यांच्या मदतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कोकणातील त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथे 1993 साली उभारलेल्या स्मारकाचे त्यांना नेहमी कौतुक असायचे. आपला फलटणचा माणूस कोकणात जावून जांभेकरांचे स्मारक उभारतोय म्हणून त्यांना हे कौतुक असायचे. कारण कोकण आणि कोकणातली माणसं त्यांनी अनुभवली होती. माझ्याबरोबर 3-4 वेळा ते यांचे खास कौटुंबिक मित्र प्राचार्य शांताराम आवटे यांच्यासह पोंभुर्ले येथील काही कार्यक्रमांना आले होते. तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कोकणातल्या विविध अनुभवांचे किस्से आमच्या गप्पात फोडणीसारखे असायचे.

बापूराव हर्णे, दाभोळ, खटाव व शेवटी फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून स्थिरावले. फलटणमध्ये त्यांची सेवा 28 वर्षे झाली. त्यांच्या संस्थेचे मानद सचिव श्री.सुभाषराव बेडके (सूर्यवंशी) यांचा उल्लेख नेहमीच ते अत्यंत कृतज्ञतेने करीत असत. अर्ज, मुलाखत वगैरे वगैरे न करता सुभाषरावांनी त्यांना थेट ‘उद्या हजर व्हा’ हे कसे सांगितले याचे वर्णन त्यांच्या बरोबरच्या संवादात कायम असायचे. शिक्षकी पेशा सांभाळत असातनाच त्यांनी वडिलांचा पत्रकारितेचा वारसा ‘सकाळ’ मधून बातमीदार म्हणून चालू ठेवला. शेवटी शेवटी अलिकडे ते ‘सकाळ’ फलटण कार्यालयाचे प्रमुख झाले होते. सुरुवातीला नेहमीप्रमाणे फलटणमधल्या त्यावेळच्या काही प्रस्थापित पत्रकारांशी त्यांना थोडाफार संघर्ष सहन करावा लागला. पण ते पत्रकारितेतल्या व तालुक्यातल्याही राजकीय गटबाजीपासून योग्य त्या अंतरावर अलिप्त राहिले. म्हणूनच त्यांची पत्रकारिता सापेक्ष, निर्भिड आणि सदैव लोकाभिमुख राहिली. आमचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता (ऐक्य), मी (लोकसत्ता, केसरी, तरुण भारत) व बापूराव देशपांडे (सकाळ) असे एकत्र राहिलो ते यामुळेच. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विविध उपक्रमात त्यांचे चांगले प्रसिद्धी सहकार्य लाभले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ व लोकाभिमुख पत्रकारितेमुळे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ पुरस्कार त्यांना सन 2015 मध्ये मिळाला. 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार 6 जानेवारी 2015 रोजी पोंभुर्ले येथील ‘दर्पण सभागृहात’ दिला त्यावेळी ते, त्यांच्या पत्नी सौ.वसुधा व सर्व कुटूंबियांसह उत्साहाने आले होते. पुरस्कार कोकणात असल्यामुळे त्यांचे कोकणातले समकालीन मित्रही आपल्या मित्राच्या सत्कारासाठी आवर्जून आले होते.

बापूराव मूळचे तरडगाव (ता.फलटण) येथील असल्यामुळे त्यांची तेथे वडिलोपार्जित शेती आहे. ती सुधारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते. आम्हाला म्हणायचे, ‘‘आता बास झाली पत्रकारिता आणि सामाजिक कार्य. आता तरडगावच्या शेतीत एक छान पण साधे टुमदार रिसॉर्ट बांधतो आणि मग बेडकिहाळ सर, तुमचे ‘शिवार साहित्य संमेलन’ (महाराष्ट्र साहित्य परिषदेचे) तेथे घेऊया आणि मस्तपैकी गप्पा मारुया.’’ पण तो योग काही आला नाही.

1991 पासून पत्रकारिता करताना त्यांनी फलटण तालुक्यातल्या सर्व गटांच्या नेत्यांबरोबर उत्तम संबंध ठेवले होते. या काळात त्यांनी फलटण तालुक्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष, धोम बलकवडी, नीरा देवधर, फलटण औद्योगिक वसाहत, फलटण – लोणंद – बारामती रेल्वे मार्ग, फलटण – लोणंद रस्त्याचे चौपदरीकरण, पालखी मार्ग व पालखी सोहळा आदींवर त्यांनी सडेतोड, वस्तुनिष्ठ लेखन केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून सर्व कार्यक्रमात त्यांचा उत्साहाने सहभाग असायचा. त्यांचे वक्तृत्त्वसुद्धा खड्या आवाजात, भारदस्तपणे पण परखड असायचे.

शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आमच्या महात्मा एज्युकेशन सोसायटीत स्वेच्छेने प्रशासन अधिकारी म्हणून शेवटपर्यंत काम केले. ज्येष्ठ नागरिक संघ, ब्राह्मण सभा, समाज प्रबोधन संस्था यासह ते साहित्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहिले. पण अलिकडे या कोरोना महामारीत दीर्घकाळ ‘लॉकडाऊन’मुळे त्यांचे माणसांत न जाणे झाल्यामुळे ते निराश होते. अधूनमधून फोन व्हायचा पण त्यात नैराश्य, कंटाळवाणी परिस्थिती असायची. नेहमी माणसात राहून, विविध कार्यक्रमातून समाजात असणार्‍यांची जी घुसमट असायची ती त्यांची पण होती. वास्तविक त्यांना निवृत्तीवेतन, पत्नी वसुधावहिनी (प्राथमिक शिक्षिका) यांनाही निवृत्तीवेतन, मुलगा वैभव व सून पूजा या पुण्यात औद्योगिक कंपनीमध्ये सुस्थितीत, मुलगी सौ.स्मिता व जावई पंकज पोटे पुण्यातच उत्तम नोकरीत. शेतीही अलिकडे सुधारलेली. त्यामुळे खरं तर बापूराव एकदम सुखी संपन्न होते. फलटणच्या बंगल्यावर वरतीही नव्यानेच बांधकाम केलेले. खरं तर आम्हा सर्वांना वाटायचे बापूराव आता पुण्यात कायम वास्तव्य करणार. पण ते येऊन जाऊन असायचे. विचारले तर म्हणायचे, ‘‘काही असो तर, आपला गाव तो आपलाच विरंगुळा.’’

असा आमचा हा बहुआयामी मित्र अचानक देवाघरी जाईल असे कोणालाच वाटले नाही. तसं 72 वय म्हणजे काही जाण्याचं वय नाही. पण गेले त्या या सार्‍या आठवणी ठेवून. आता फलटणमधल्या अनेक कार्यक्रमातून बापूराव यांची अनुपस्थिती जाणवणार, पण हीच खरी त्यांची योग्य स्मृती ! आठवणीत राहील अशी आणि आता फक्त मनातल्या कागदावरच !

– रविंद्र बेडकिहाळ,
ज्येष्ठ पत्रकार, फलटण.


Back to top button
Don`t copy text!