दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
धोम बलकवडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजवा कालवा किमी ८६ मधील ६ क्रमांक ८५/२०० येथून निघणार्या आळजापूर वितरिकेच्या खुल्या कालव्याऐवजी बंदीस्त पाईपलाईन टाकण्याच्या योजनेस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामाच्या २१ कोटी १८ लाख ७६ हजार ३५४ रुपये खर्चास मान्यता मिळाली आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन होऊन कामास सुरुवात होणार आहे. हे काम मंजूर होण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी वेळोवेळी संबंधित अधिकार्यांशी पाठपुरावा करून या सर्व गावातील पाण्यापासून बराच काळ वंचित राहिलेल्या शेतकर्यांना न्याय मिळवून दिला आहे. आळजापूर वितरीकेद्वारे एकूण १६७५.७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हे काम मार्गी लावले असताना या प्रकल्पाचे श्रेय हिंगणगाव गटाचे माजी जि. प. सदस्य घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी खासदार रणजितसिंह यांचे निकटवर्तीय शंभूराज बोबडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या प्रकल्पातील शेतकर्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल दि. १९ जून २०२४ रोजी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले. मात्र, हे न रुचलेल्या माजी जि. प. सदस्य यांनी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू केला. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे २०२१ चे पत्र दाखवून सोशल मीडियाचा वापर करून खोटे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असा आरोप सासवड येथील राजेंद्र काकडे यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी या नियोजित कामाच्या मान्यतेची सविस्तर माहिती दिली. तेव्हापासून माजी जि. प. सदस्य यांना आपण १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा हे काम न करता आल्याची जाग आली व न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करण्याचा प्रयत्न केला व सोशल मीडिया व वृत्तपत्रात खोट्या बातम्या देण्यास सुरुवात केली आहे.