
स्थैर्य, फलटण, दि. १४ सप्टेंबर : ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून ‘जगातील सर्वात तरुण नगरसेविका’ म्हणून नामांकन मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल, फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री सुंदरगिरी महाराज यांनी नुकताच विशेष सत्कार केला. महाराजांनी कु. सिद्धाली शहा यांच्या फलटण येथील निवासस्थानी स्वतः सदिच्छा भेट देऊन त्यांचा हा यथोचित सन्मान केला आणि आशीर्वाद दिले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना श्री सुंदरगिरी महाराज यांनी अत्यंत मार्मिक विचार मांडले. ते म्हणाले की, “नगरसेवक अथवा नगरसेविका म्हणून जनतेचे काम करणे, हे खऱ्या अर्थाने ईश्वराची पूजा करण्यासारखेच आहे. आपल्या भागातील गोरगरीब आणि दुर्बल घटकांना नगरसेवक मदत करत असतात. जे नगरसेवक या दीनदुबळ्या व्यक्तींना आधार देतात, तेच खऱ्या अर्थाने खरी ईश्वरसेवा करत असतात.”
पुढे बोलताना महाराज म्हणाले की, “कोणताही लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो, तेव्हा त्यामागे नक्कीच त्याच्या पूर्वजन्माची आणि त्याच्या आई-वडिलांची मोठी पुण्याई उभी असते. कु. सिद्धाली अनुप शहा यांचे समाजातील कामकाज हे अतिशय आदर्शवत आहे. त्यांनी जो जागतिक स्तरावरील विक्रम आणि मानांकन पटकवले आहे, ते त्यांनी केलेल्या याच मनुष्यरूपी ईश्वरसेवेचे उत्तम फळ आहे.” अशा शब्दांत त्यांनी कु. सिद्धाली शहा यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
या सत्कार प्रसंगी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री सुंदरगिरी महाराज यांच्यासह फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा, युवा नेते संजय देशमुख, गजानन पेटकर, भारती पेटकर, भाग्यश्री जेबले, रूपाली साळुंखे, पद्मा चांडक, वर्षा कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, महेश पटवर्धन, अशोक सतुटे, पद्मा सतुटे आणि सुनीता सतुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.