संभाव्य जलसंकटावर उपाययोजना; जुलै २०२७ पर्यंत धरणातील पाणी आरक्षित

वाढत्या एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जुलै २०२७ पर्यंत पाण्याचे टंचाई नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २८ सप्टेंबर : प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जुलै २०२७ पर्यंतच्या पाण्याच्या गरजेचा अंदाज घेऊन ‘वॉटर बजेट’ तयार करण्याचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणांमधील उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

जिल्हानिहाय वॉटर बजेट आणि चारा छावण्यांचे नियोजन

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये आधीच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे टंचाई निवारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून सर्वप्रथम जुलै २०२७ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण केली जाईल. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार तातडीने चारा डेपो आणि चारा छावण्या उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

रोहयोची कामे आणि दुष्काळी सवलती लागू

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोची कामे प्राधान्याने सुरू केली जाणार आहेत. याशिवाय शेतकाऱ्यांचे जमीन महसूल माफ करणे, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासारख्या विविध सवलतींची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!