
वैद्यकीय साहित्यांवरील अफाट नफेखोरी रोखण्यासाठी केंद्राने ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २८ सप्टेंबर : सीटी स्कॅन, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर होणारी अवाजवी नफेखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मेडिकल डिव्हाइस रुल्स (MDR) च्या चौकटीत बदल करत आता ‘ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन’ (TMR) लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे रुग्णालये आणि वितरकांकडून उपकरणांवर लादला जाणारा अफाट नफा मर्यादित होईल, ज्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
अफाट नफेखोरीवर लगाम
सध्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी किमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या किमतींमध्ये तब्बल ५०० ते २५०० टक्क्यांपर्यंतचा फरक असल्याचे विविध पाहणीत समोर आले होते. अनेक खासगी रुग्णालये आणि मध्यस्थ वितरक एमआरपीच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत होते. नव्या टीएमआर धोरणामुळे उत्पादन खर्च किंवा आयात किमतीच्या आधारावरच विक्रीच्या लाभांशाची (ट्रेड मार्जिन) कमाल मर्यादा निश्चित केली जाणार आहे.
रुग्ण सेवेचा खर्च घटणार
केंद्राच्या या पावलामुळे गंभीर आजारांवरील उपचारादरम्यान लागणारी वैद्यकीय साधने, डायग्नोस्टिक चाचण्या आणि आयसीयूमध्ये वापरली जाणारी उपकरणे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे येत्या काळात आरोग्य सेवा अधिक परवडणारी आणि पारदर्शक बनेल, असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.



