
स्थैर्य, दि १६: प्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक आणि शाकाहार, सदाचारचे प्रणेते म्हणून रतनलाल सी बाफना यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांनी सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला अशी माहिती जारी करण्यात आली आहे. याच दिवशी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांचा अंत्यविधी आर.सी. बाफना गोशालेत कुटुंबाच्या उपस्थित करण्यात येत आहे.
रतनलाल बाफना यांचा जन्म राजस्थानमधील भोपालगड येथे झाला. 10 पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जळगावात दाखल झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स इथं नोकरी केली होती. नोकरी करत असताना त्यांनी सोन्याच्या व्यवसायातील कसब हस्तगत केला होता. या कामात सर्वात महत्त्वाचा असणारा लोकांचा विश्वास त्यांनी जिंकला होता. तब्बल 19 वर्ष त्यांनी नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोने-चांदीच्या व्यवसायात आर. सी.बाफना ज्वेलर्स हा ब्रँड रतनलाल बाफना यांनी नावारुपास आणला.
1974 मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिली आणि स्वत: च्या नावाने म्हणजे आर. सी. बाफना ज्वेलर्स हे दुकान सुरू केले. 1974 मध्ये लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरित झाले आहे. जळगावनंतर औरंगाबाद आणि नाशिकमध्येही आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहे. यासोबत जळगावात गोशाळा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. बाफना यांच्या पश्चात पत्नी,मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची मुलं सुद्धा आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काम पाहत आहे. त्यांच्या निधनामुळे सुवर्णनगरी पोरकी झाली अशी भावना व्यक्त होत आहे.