दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२४ | फलटण |
सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने फलटण शहर परिसरात दलदल निर्माण झालेली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता फलटण नगर परिषद नागरी आरोग्य केंद्रामा़र्फत शहरातील घरांचा सर्व्हे करण्यात येत आहे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी दिली आहे.
आत्तापर्यंत शहरातील एकूण-२८७१ घरांचा सर्व्हे करणेत आलेला आहे. त्यामध्ये ५२३४ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये १२३ दूषित कंटेनर आढळून आले असल्याने सदरच्या घरातील असणारे पाणीसाठे म्हणजे पाण्याचे हौद, बॅरल रिकामे करण्यात आले व सदर ठिकाणी धूर फवारणी केली आहे.
आत्तापर्यंत नगर परिषद हद्दीत एकून ८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव पसरू नये याकरिता नगर परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये धूर फवारणी करणे, गटर नाले स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे तसेच शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटप करण्यात येत आहेत.
डेंग्यूच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता नागरिकांनी आपणाकड़े असणारे पाणीसाठे वरचेवर रिकामे करावेत तसेच फ्रीज वारंवार चेक करावेत इ. उपाययोजना करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकार्यांनी केले आहे.