स्थैर्य, वर्धा, दि. १२: हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या सर्व सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवतण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. या प्रकारामुळे शासकीय तसेच खासगी वसतीगृह सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
हिंगणघाट शहराच्या सातेफळ एका खासगी संस्थेचे निवासी वसतिगृह आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. या विद्यार्थ्यांवर शहरातील एका खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरू होते. दरम्यान विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. बुधवारी वसतिगृहातील 39 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आलीय त्यापैकी 30 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर गुरुवारी वसतिगृहातील 247 विद्यार्थी आणि 30 कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या चाचणमध्ये आणखी 45 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
फक्त दोन दिवसात या निवासी वसतिगृहातील तब्बल 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील परिसरात खळबळ आडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेले सर्व विद्यार्थी हे दहा ते बारा वर्षे या वयोगटातील आहे. त्यामुळे या प्रकारामुळे कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकामंध्ये चिंतेचं वातावरण आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी एकाच वसतिगृहातील असल्याने त्यांना त्याच वसतिगृहात विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. येथील आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर उपचार केले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना सौम्य तर काहींना लक्षणेदेखील नसल्याचे सांगण्यात येत आहे. वसतीगृहात सर्व विद्यार्थी सोबतच राहत असतात. सोशल डिस्टन्सिगचे नियम तेवढ्या क्षमतेने पाळता येत नाहीत. त्यात वर्धा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने वसतीगृहतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यात खरंच सरकारी आणि खासगी संस्थांची वसतीगृहे सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.