रत्नागिरीसाठी ७५ कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी तात्काळ मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, 7 : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये व सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले.

ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले.

अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

भूमिगत विद्युत तारांबाबत विचार

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, साहजिकच आहे की संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईल. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे असे म्हणून मुख्यमंत्री म्हणाले की, कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का याचा विचार करणे गरजेचे आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊन पंचनामे करा

मुख्यमंत्री म्हणाले की मदत कार्य करतांना तुम्ही प्राधान्य ठरवा,लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका.प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा,पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या . आता पाउस येईल त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार , मच्छीमार यांना तातडीने मदत करा.

प्रशासनाचे कौतुक

कोरोनाच्या संकटाचे आव्हान असतांना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झालेला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी 25 ते 30 कोटी रुपये देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!