७४० जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; कर्मचाऱ्यांचे धैर्य कौतुकास्पद : जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२६: कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर विशेष प्रयत्न चालू असून जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील ७९८ कर्मचारी आजवर बाधित झाले.त्यापैकी तब्बल ७४० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते कर्तव्यावर रुजू आहेत.ही बाब कौतुकास्पद आहे; तथापि सध्या वाढत्या आकड्यांनी भयभीत न होता स्वतःची काळजी घेण्यासह आपल्याकडील ज्ञान सामान्य नागरिकांना देण्याचा प्रयत्न करून प्रबोधन करावे, अशा भावना एका पत्रकाद्वारे सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाग्रस्त झालेल्या ज्या 17 कर्मचाऱ्यांचे निधन झाले त्यापैकी चार जणांना 50 लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे इतरांचे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अशी माहिती देखील श्री जाधव यांनी दिली जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपाययोजना पूर्ण क्षमतेने राबविण्यात येत आहेत.त्याला नागरिकांनी आजवर प्रतिसाद दिला आहे.कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना केला आहे आणि करीत आहेत.इथून पुढेही गाफील न राहता प्रतिसाद द्यावा,असे आवाहन करून पत्रकात पुढे म्हटले आहे की; जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्वच कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर अविरतपणे कर्तव्य बजावत असताना कोरोनाशी लढा दिला आहे.आजवर ७९८ पैकी ७४० कर्मचारी पूर्णतः बरे झाले असून सक्रिय रुग्णांवर यशस्वी उपचार चालू आहेत.आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग ,पोलीस तसेच महसूल विभाग अशा सर्वांच्या प्रयत्नातून हे यश मिळत आहे .शेकडो कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता नियंत्रणाचे काम अविरतपणे चालू ठेवले आहे. अजूनही त्यांचे काम चालू आहे, याचा विशेष अभिमान वाटतो.असे देखील पत्रकात नमूद केले आहे .इतर उपायांबरोबरच जनजागृती देखील पूर्ण क्षमतेने करण्यात येत आहे. विविध माहितीपुस्तिका, माहितीपत्रके ,तसेच पोस्टर ,बॅनर याद्वारे जिल्ह्यात जनजागृती होत आहे .जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे सर्वच अधिकारी आणि संबंधित कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी झटत आहेत.जनतेने इथून पुढेही सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घेण्यासह प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांनी ग्राम सुरक्षा समिती आणि प्रभाग समित्या यांना यासंदर्भात सहकार्य करावे,असे देखील कळकळीचे आवाहन पत्रकात केले आहे.


Back to top button
Don`t copy text!