भांडण लावून मांत्रिकाने लाटले तब्बल ६ कोटी


 

स्थैर्य, बेळगाव, दि.१३: कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट गीत आणि संगीतकार के. कल्याण व त्यांची पत्नी अश्विनी यांच्यामध्ये भांडण लावून कल्याण यांच्या सासू-सास-याची तब्बल सहा कोटींची मालमत्ता भामटा मांत्रिक शिवानंद वाली यांनी लाटली आहे. यामध्ये सोने-चांदीसह स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शिवानंद वाली याने त्याची सहकारी गंगा उर्फ ज्योती कुलकर्णी हिलासोबत घेऊन कल्याण यांची पत्नी अश्विनी, सासरे कृष्णा सात्विक व सासू राधिका सात्विक या तिघांचे वशीकरण करून त्यांना बेंगळुरूहून बेळगावात आणले. तुमच्या नावावर मालमत्ता असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे असे सांगत त्याने कल्याण यांच्या सासू-सास-यांकडून भूखंड, फ्लॅट अशी सहा कोटींची मालमत्ता नावावर करून घेतली. यापैकी दोन मालमत्ता त्यांच्या प्रत्यक्ष नावावर झाल्या असून चार मालमत्तांचे शिवानंद वालीने स्वत:च्या नावे वटमुखत्यारपत्र करून घेतले आहे. 

सात्विक कुटुंबाकडून भामट्या शिवानंद वालीने सुमारे चाळीस लाखांहून अधिक रक्कम, ३५0 ग्रॅम सोने, ६00 ग्रॅम चांदी देखील काढून घेतले आहे. या मालमत्तेतून शिवानंद वालीने १0 मॅक्सिकॅब खरेदी केल्याचे आढळून आले असून पोलिसांनी त्या देखील जप्त केल्या आहेत. सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत शिवानंद वालीकडून ही सर्व माहिती मिळाल्याचे डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले आहे. याशिवाय वालीची साथीदार गंगा कुलकर्णीचा शोध सुरू असून तिलाही लवकरच अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!