महानिर्मितीचा ४.२ मेगावॅट सोनगाव सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । नागपूर । रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. त्यात ४.२ मेगावॅटचा सोनगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील सौर ऊर्जा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात  महानिर्मितीला यश आले आहे.

सोनगाव  – स्थापित क्षमता ४.२ मेगावाट :

        सोनगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या ४ गावांना  सोनगाव, राजळे, साठे फाटा आणि सराडे  या गावातील सुमारे १७००  कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/२२ के.व्ही. राजळे उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १०  हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर  हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १६ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३७१.६२  मेगावाट स्थापित क्षमतेच्या  सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे.

           या सौर ऊर्जा  प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर  १० व्यक्तींना  रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

 आगामी जून महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी (जिल्हा-सांगली) २ मेगावाट, कुंभोज (जिल्हा-कोल्हापूर) ४.४ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.

         मा.उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांचे निर्देशानुसार तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली १०० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी  विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे तसेच ४०० मेगावाटचे इरादा पत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.   आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण सौर प्रकल्प चमू यासाठी परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!