उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी ३३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१६: महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभीकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे, शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती आदी विकासकामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. ही विकासकामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कामे पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वरचे सौंदर्य अधिक खुलेल आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची ‘मॉल रोड’च्या धर्तीवर सुधारणा करताना हे रस्ते रुंद करण्यात येतील. त्यांची रंगसंगती आणि नामफलक एकाच पद्धतीचे असतील. वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्यात येतील. पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात येईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळेस दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात येईल. शहरातील ऐतिहासिक पेटीट लायब्ररीचे नूतनीकरण करण्यात येईल, यासंदर्भात करावयाच्या विविध विकासकामांचे सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मकरंद पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!