फलटण विधानसभेसाठी शेवटच्या दिवशी २६ उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
२५५ फलटण (अजा) विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १९ उमेदवारांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले तर आतापर्यंत एकूण २८ उमेदवारांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार, दि. ३० रोजी सकाळी ११ वाजलेपासून तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

सन २००९, २०१४ व २०१९ असे सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झालेल्या दीपकराव चव्हाण यांनी चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे या महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे सचिन सुधाकर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या मतदारसंघातून यापूर्वी दोनवेळा निवडणूक आखाड्यात उतरून लक्षणीय मते घेतलेल्या दिगंबर आगवणे यांनी यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व अपक्ष असे २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या पत्नी व पंचायत समिती माजी सदस्या जयश्री आगवणे यांनीही २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

प्रशांत वसंत कोरेगावकर यांनी भाजप, राष्ट्रवादी, अपक्ष असे ३, दीपक रामचंद्र चव्हाण सनई छत्रपती शासन या पक्षाकडून १ व २ अपक्ष, भीमराव विठ्ठल बाबर रासप, सचिन जालिंदर भिसे वंचित बहुजन आघाडी, जयश्री दिगंबर आगवणे रासप व अपक्ष असे २, रमेश तुकाराम आढाव स्वाभिमानी पक्ष व अपक्ष असे २ आणि सूर्यकांत मारुती शिंदे, कृष्णा काशिनाथ यादव, अमोल कुशाबा अवघडे, हिंदूराव नाना गायकवाड, बुवासाहेब पंडित हुंबरे, गौतम वामनराव काकडे, नंदू संभाजी मोरे, गणेश नंदकुमार वाघमारे, चंद्रकांत राजाराम भालेराव, नितीन भानुदास लोंढे, गंगाराम अरुण रणदिवे, राजेंद्र भाऊ पाटोळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

 


Back to top button
Don`t copy text!