ग्रंथालयांना मिळणार 23.7 टक्के अनुदान; शासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, गोडोली (जि. सातारा), दि.५ : देशभर पसरलेल्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेली आठ महिने ग्रंथालये बंद होती. शासनाने अलीकडे वाचनालये उघडायला किमान अटीवर परवानगी दिली. कर्मचारी कामाला लागले; पण आजअखेर शासनाने प्रत्यक्ष एक दमडीही वाचनालयाच्या खात्यावर जमा केलेली नाही. पुढील काळात 23.7 टक्के अनुदान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक थकित अनुदान 100 टक्के मिळणे अपेक्षित असताना केवळ 23.7 टक्के जाहीर करून शासनाने सेवकांची थट्टा चालवली आहे. 

सातारा जिल्ह्यात “अ’, “ब’, “क’, “ड’ या श्रेणीतील 395 ग्रंथालये आहेत. वाचन संस्कृती वाढावी, लेखक, कवी व वेगवेगळ्या प्रकारातील साहित्यिक घडावेत. जुन्या साहित्यिकांचा वारसा जतन व्हावा म्हणून शासनाच्या सहकार्यातून अनेक गावांत शासनमान्य वाचनालये सुरू आहेत. त्यात अपुऱ्या अनुदानाचा फरक भरून काढण्यासाठी संचालक मंडळ पदरमोड करणे, देणग्या घेऊन वाचन परंपरा जोपासत आहे. मात्र, कोविडमुळे सगळीकडेच आर्थिक चणचण जाणवत असल्याने देणग्यांचा ओघही आटला आहे. 

अनुदान थांबवल्याने कर्मचाऱ्यांची “आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना’ अशी स्थिती झाली आहे. तोकड्या अनुदानावर चाललेली वाचन चळवळ कोरोनाने घाईला आली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, पुस्तक खरेदी, वीजबिल, इमारत भाडे आदी खर्च कसा करायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत शासनाने थकित अनुदानासह 100 टक्के अनुदान त्वरित जमा करावे व कर्मचाऱ्यांची उपासमार टाळावी. अन्यथा पुढील काळात ग्रामीण भागातील अनेक वाचनालये बंद होऊन वाचन संस्कृतीला खिळ बसेल, अशी चर्चा सुरू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!