दैनिक स्थैर्य | दि. १० सप्टेंबर २०२४ | मुंबई |
महानिर्मिती कंपनी, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५% वाढ देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाही वेतनात वाढ केली आहे.
या वीज कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी वेतनवाढीची माहिती दिली. वीज सहायकांना परिवीक्षाधीन कालावधीत ५ हजार रुपयांची वाढ व तांत्रिक कर्मचार्यांना मिळणारा ५०० रुपयांचा भत्ता एक हजार रुपये इतका करण्यात आला आहे.
वीज कर्मचार्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असली तरी वीज देयकांची थकबाकी वाढतच चालली आहे. महावितरणकडे कृषी, घरगुती, वाणिज्यिक आणि व्यावसायिक आदी विविध संवर्गातील ग्राहकांची ७४ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी ४५-४६ हजार कोटी रुपये थकबाकी कृषी ग्राहकांची आहे.