स्थैर्य, हैदराबाद (वृत्तसंस्था), दि.२३ : सैन्यात मेजर
असल्याचं खोटं सांगून आणि लग्नाचं आमिष दाखवून तब्बल 17 कुटुंबीयांना गंडा
घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने 17 कुटुंबामधील
मुलींना लग्नाचं आमिष दाखवून तब्बल साडे 6 कोटी रुपये लुटल्याची घटना समोर
आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
हैदराबादमध्ये फसवणुकीची ही घटना घडली आहे.
मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान असं या आरोपीचं नाव आहे. आंध्र
प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील लमपल्ली गावाचा हा रहिवासी आहे. सैन्य दलात
अधिकारी असल्याचा दावा करत त्याने तब्बल 17 कुटुंबीयांना फसवलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे त्याने आतापर्यंत साडे सहा कोटी रुपये लुटल्याची
माहिती मिळाली आहे. बनाावट अधिका-याला पोलिसांनी अटक केली असून कसून चौकशी
सुरू केली आहे.
साताऱ्यात स्वाभिमानीचा ‘आक्रोश’; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा
पोलिसांनी आरोपीकडून तीन नकली पिस्तूल, सैन्य दलाची वर्दी आणि सैन्याचं
बनावट ओळखपत्र जप्त केलं आहे. तसेच कार आणि 85 हजार रुपयांची रोख रक्कम
देखील ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा फक्त
नववी पास आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याचं खोटं सर्टिफिकेट तयार
करून घेतलं होतं. त्याला एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. त्याची पत्नी
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहाते.