सातारा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा आदर्श बनविणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । आदर्श शिक्षण देणे आणि आदर्श नागरिक घडविणे हे शासनाचे तसेच प्रशासनाचे उत्तरदायित्व असून त्या अनुषंगाने पाऊल टाकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या  15 प्राथमिक शाळा आदर्श म्हणून विकसित करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री  तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराज देसाई यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या  बैठकीदरम्यान श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कार्यकारी अभियंता श्री. खैरमोडे यांच्यासह  संबंधित  विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शाळांच्या विविध निकषांच्या आधारे १५ शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श शाळा निर्मिती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ध्येयपूर्तीसाठी, “शालेय वातावरण सुशोभिकरण करणे, विद्यार्थ्यांचा शारीरिक,बौध्दिक व मानसिक विकास करणे ” या मूल्यांचा विकास करण्याचा समावेश आहे. शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करण्यामध्ये; वर्गखोली बांधकाम, विज्ञान व गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय व संगणक कक्ष, स्वयंपाकगृह, पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हँड वॉश, रँप, क्रीडांगण विकास, सौर ऊर्जा, वर्गखोल्यांची दुरुस्ती ही कामे करण्यात येणार आहेत. या शाळांच्या भौतिक सुविधांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या शाळांचे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या.

या आदर्श शाळा निर्माण झाल्यास जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांचा दर्जा वाढेल, ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि विदयार्थ्यांचा शारिरीक बौद्धिक मानसिक असा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.  तसेच या शाळांच्या विकासाप्रमाणेच इतर शाळांना प्रोत्साहन मिळून दर्जात्मक उंची वाढेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकमंत्री तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. त्याअनुषंगाने 15 शाळा पूर्ण क्षमतेने विकसित केल्या जातील अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!