मुंबई : महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्यातील महासंचालक पद रिक्त झालं होतं. या रिक्त पदावर आता हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत. सुबोधकुमार जयस्वाल यांच्यानंतर सेवाजेष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा नंबर लागतो. मात्र संजय पांडे हे या वर्षीच जून महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सेवाजेष्ठतेनुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हेमंत नगराळे यांची पोलिस महासंचालक पदावर वर्णी लागली आहे.
हेमंत नगराळे यांची थोडक्यात कारकीर्द :
- हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता.
- २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली होती.
- त्यानंतर नगराळे महाराष्ट्र पोलिस विभागातील विधी आणि तंत्रज्ञान विभागात महासंचालक म्हणून कार्यरत होते
काही दिवसांपूर्वी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजकारण ढवळून निघालं होतं. यानंतर सुबोधकुमार जयस्वाल यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर सुबोधकुमार जयस्वाल याना बदली देण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल आता केंद्रात काम करणार आहेत. दरम्यान जयस्वाल यांच्यानंतर कोण असा सातत्याने सवाल होत होता. यावर आता उत्तर मिळालं आहे. लवकरच नगराळे आपला पदभार स्वीकारणार आहेत.