दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या घोषवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२३-२४ राजुरी, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिराच्या तिसर्या दिवशी ‘तरुण पिढीसमोरील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रास्ताविक करताना व्याख्यानाची पार्श्वभूमी व मार्गदर्शकांचे ओळख याबद्दल सविस्तर माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे यांनी दिली. सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. विनोद घोलप यांनी दर्शवली. मुधोजी महाविद्यालय, फलटणचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर पवार यांनी मार्गदर्शन करताना आजची तरुण पिढीची परिस्थिती, मानसिकता, व्यसनाधीनता, तरुण पिढी समोरील दैंनदिन जीवनातील ताण व राग व्यवस्थापन, सामजिक माध्यमांचा अति वापर व त्यांचे परिणाम या विषयावर सर्व उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील सहायक प्राध्यापक श्री. मनोज शहा यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व्यसनाधीनता व दैनंदिन जीवनातील ताण व राग व्यवस्थापन याचे महत्त्व समजून घेऊन सर्व उपस्थितांनी आपल्या जीवनामध्ये अनुकरण करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राजुरी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. श्रेया गायकवाड हिने केले, तर आभार अथर्व देवकर याने मानले.