लवकरच १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा; अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२६ | नवी दिल्ली |
केंद्र सरकारने १० आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या क्षेत्रीय चाचणीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केलेल्या प्रस्तावानुसार कागदी चलनी नोटांसोबतच या नोटाही जारी केल्या जाणार आहेत. या नोटांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी २७ जुलै रोजी लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत अधिक माहिती दिली होती. आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार पॉलिमर नोटांचे आयुष्य कागदी नोटांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक असते, असे त्यात म्हटले होते. पॉलिमर नोटा जारी करण्याची प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात असून, त्यांचा डिजिटल पेमेंटवर काही परिणाम होतो का, हे या नोटांचा नियमित वापर सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

जागतिक निविदा प्रक्रिया
१७ जुलै रोजी आरबीआयच्या मालकीच्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने पॉलिमर चलनी नोटांच्या छपाईसाठी वापरल्या जाणार्‍या पॉलिमर सब्स्ट्रेटच्या उत्पादन व पुरवठ्यासाठी जागतिक स्तरावर इरादापत्रे मागवली आहेत. विविध मूल्यांच्या नोटांसाठी मोठ्या प्रमाणात पॉलिमर सब्स्ट्रेटची खरेदी करण्याचा सरकारचा मानस असल्याचे निविदा दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे. यासाठी आगामी अंतिम निविदा किंवा भविष्यातील निविदांमध्ये मोठ्या प्रमाणातील मागणी वाढवली जाऊ शकते.

२,८१० कोटी नोटांची छपाई
आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सुमारे २,८१० कोटी चलनी नोटांचा पुरवठा केला. त्यासाठी नोटांच्या छपाईवर ४,८०० कोटीं रुपयांहून अधिक खर्च आला होता. या काळात खराब झालेल्या सुमारे १,७०० कोटी नोटा नष्ट करण्यात आल्या. त्याच आर्थिक वर्षात चलनातील नोटांचे मूल्य ११.९ टक्क्यांनी, तर नोटांच्या संख्येत १०.५ टक्क्यांनी वाढ झाली.

कागदी नोटाही चलनात राहणार
पॉलिमर नोटा कागदी चलनी नोटांची जागा घेणार नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले होते. आरबीआयच्या माहितीनुसार, पॉलिमर नोटा कागदी नोटांसोबतच चलनात आणल्या जाणार असून, कागदी चलन पूर्णपणे बंद करून पॉलिमर नोटा आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. नोटा आणि डिजिटल पेमेंट व्यवस्था या नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या परस्परपूरक पद्धती आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!