राज्याची राजधानी आता डोळ्यांत साठवता येणार, ‘मुंबई आय’ : 800 फूट उंचीवरून घडणार दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१: इंग्लंडमधील “लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईतही “मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. मुंबई आयमधून पर्यटकांना ८०० फूट उंच आकाशातून मुंबईचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. “लंडन आय’ हा मोठ्या आकाराच्या आकाश पाळण्यासारखा आहे. थेम्स नदीच्या काठावर “लंडन आय’ उभे आहे. “लंडन आय’ची उंची १३५ मीटर आहे. दरवर्षी “लंडन आय’ला जवळपास ३५ लाख पर्यटक भेट देतात. लंडन आयमध्ये ३२ अंडाकृती आकाराच्या कुप्या आहेत. मुंबई आय १३ वर्षांपूर्वीचा हा प्रकल्प आहे. सरकारने या प्रकल्पाच्या निविदा मार्चमध्ये काढल्या आहेत. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ मुंबई आय साकारण्यात येणार आहे. मुंबई आय हे मुंबापुरीतील आकर्षणाचे मुख्य केंद्र बनू शकते. एमएमआरडीए हा प्रकल्प उभारत आहे. २०२१ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय पर्यटकांच्या येणार सेवेत
मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी वरळी दुग्धालयाच्या १४ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. मुंबईचे हे मत्स्यालय बँकॉक येथील ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे असणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२०-२१च्या राज्य अर्थसंकल्पात मत्स्यालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमधील मत्स्यालय काम करेल. मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता शहरातील पर्यटनस्थळे त्याच दर्जाची करण्याचे पर्यटन विभागाची योजना आहे. शहरातील २२ प्रमुख पर्यटनस्थळांत या मत्स्यालयाची नवी भर पडणार आहे.


Back to top button
Don`t copy text!