टाकेवाडीत कत्तलीसाठी डांबलेल्या २३ वासरांची सुटका; पोलिसांची धडक कारवाई

माण तालुक्यातील टाकेवाडी येथे कत्तलीसाठी बंद घरात कोंडून ठेवलेल्या २३ वासरांची गोरक्षक व दहीवडी पोलिसांनी सुटका केली असून एका संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे.

स्थैर्य, दहीवडी, दि. २९ जून : माण तालुक्यातील टाकेवाडी येथे सतोबा मंदिराच्या परिसरात एका बंद घरात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या २३ वासरांची गोरक्षक आणि दहीवडी पोलिसांनी सुटका केली. या जनावरांना चारा पाण्याविना उपाशी ठेवण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात संशयितावर दहीवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीवरून टाकली धाड

महाराष्ट्र शासनाचे मानद प्राणी कल्याण अधिकारी अवधुत धुमाळ यांना टाकेवाडी येथे एका घरात गायीची वासरे कत्तल करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते दिनेश पवार यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. बंद घराजवळून जनावरांच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी तत्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले.

२३ जनावरांची सुटका

दहीवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. दरवाजा उघडला असता, आतमध्ये २२ जर्सी वासरे आणि एक देशी गायीचे वासरू उपाशीपोटी डांबून ठेवल्याचे आढळून आले. सुमारे २३ हजार रुपये किमतीची ही सर्व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुरक्षित सुटका केली.

संशयितावर गुन्हा दाखल

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल मोहिते आणि शिवाजी बळोप यांच्या मालकीच्या या बंद घरात एका अज्ञात व्यक्तीने या वासरांना कत्तलीच्या उद्देशाने लपवून ठेवले होते. या अमानुष कृत्याप्रकरणी अवधुत धुमाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दहीवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!