प्रा. सलीम शेख एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. ‘केमिस्ट्री’चे उत्तम शिक्षक, बायोलॉजीपण मनापासून उत्तमरित्या शिकवत असत.
आज मी डॉक्टर झालो ते केवळ त्यांच्यामुळेच. पहिल्या रांगेत त्यांच्या पायापाशी बसून शिकण्याचा मला सुवर्णयोग आला. त्यांनी शिकविलेली अशी कित्येक मुले आणि मुली आहेत की, जी आज डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट होऊन समाजामध्ये दिमाखाने वावरत आहेत.
‘जीव तोडून शिकविणे’ हा प्रा. सलीम शेख यांचा बाणा होता. कडक शिस्त, शीघ्रकोपीपण तेवढेच, मात्र प्रेमळ आणि विनोदी स्वभावाचे होते.
जुन्या हिंदी सिनेमांचे आणि नटनट्यांचे भोक्ते. सर्व गाणी पाठ, सर्व संगीत दिग्दर्शकांची माहिती त्यांना होती.
अष्टपैलू क्रिकेटपटू, शॉर्ट लेगला फिल्डींग करून बरेच कॅचेस त्यांनी घेतले होते.
दोन्ही मुलींना उत्तम शिकवून मोठे केले, त्यांचे जावई उच्चपदस्थ आहेत.
असा शिक्षक परत होणे नाही. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ तुमच्यामुळे याची कायम आठवण राहील आणि तुम्ही जरी गेला असाल तरी तुमची शिकवण सतत आमच्या मनात तेवत राहील.
आमच्या आदरणीय सलीम शेख सर यांना आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
– माजी विद्यार्थी, मुधोजी कॉलेज