
स्थैर्य, सातारा, दि.10 नोव्हेंबर : महा ई-सेवा व आधार नोंदणी संघटनेच्या वतीने १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान संप पुकारला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील महा ई-सेवा संघटनेतर्फे तीन दिवस जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र बंद राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष अरुण घबाडे यांनी ही माहिती दिली.
निवेदनातील माहिती अशी: महा ई-सेवा व आधार केंद्र चालवताना केंद्र चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाआयटी कंपनीने २०२१ पासूनचे आधारचे कमिशन केंद्र चालकांना दिलेले नाही. प्रत्येक आधार मशिनसाठी शासनाने ५० हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली आहे. मात्र, मुदत संपली, तरी शासनाने केंद्र चालकांचीअनामत रक्कम परत दिलेली नाही. शासनाने आपले सरकार नावाचेस्वतंत्र पब्लिक पोर्टल तयार केले आहे. नागरिकांसाठी वेबसाइट तयार केल्या आहेत, तरीही शासनाच्या माध्यमातून नवीन महा ई-सेवा व आधार केंद्राच्या आयडी देण्याचा घाट घातला जात आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायत वमंडल अधिकारी कार्यालयात आपले सरकार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महा ई सेवा केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. वास्तविक, शासनाच्या माध्यमातून तुटपुंजे कमिशन देण्यातयेते. तेही वेळेवर मिळत नाही. आधार नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास शासनाकडून कुठलीही मदत करण्यात येत नाही. केंद्र चालकांना अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे शासनाने महा ई-सेवा केंद्र चालकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. तीन दिवसीय संपामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनीही केंद्र चालकांच्या अडचणी समजून या संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन घबाडे यांनी केले आहे.
त्याबाबतचे निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले. राज्य निरीक्षक संग्रामसिंह पलंगे, जिल्हा खजिनदार प्रशांत फल्ले, सदस्य राजेंद्र पाटील,जयवंत यादव, नितीन इंगवले, अंकुश जाधव, सनी वायदंडे, दत्ता जाधव, प्रदीप जैन, ज्योतिबा पाटील, राजू शिर्के, प्रवीण डुबल, स्वप्नील सूर्यवंशी, लियाकत पालकर, तौफीक वाईकर, सर्फराज मुल्ला, श्रीमंत चव्हाण, अमित गायकवाड व महा ई-सेवा केंद्र चाल उपस्थित होते.
तांत्रिक अडवणींचा तत्काळ निपटारा करावा, आपले सरकार व आधार नोंदणी पोर्टलवर तांत्रिक अडचण आल्यानंतर त्याची लवकर दखल घेतली जात नाही. त्यामुळे केंद्र चालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने केंद्र चालकांना येणाऱ्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी तत्काळ प्रयत्न करावेत.– अरुण घबाडे,अध्यक्ष, महा ई-सेवा संघटना.

