पुणे मसापच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी; सातारा जिल्हयाला पहिल्यांदाच बहुमान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२४ | सातारा |
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या आणि प्रतिनिधींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा कार्यकारी मंडळाच्या शुक्रवारी मसाप, पुणे येथे झालेल्या बैठकीत भरण्यात आल्या. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. यात कोषाध्यक्षपदी सातारा जिल्हा प्रतिनिधी, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष आणि जनता सहकारी बँकेचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. मसाप, पुणेच्या वरिष्ठ तीन पदांपैकी हे एक पद असून यापूर्वी मसापच्या ११७ वर्षाच्या इतिहासात सातारा जिल्हयाला एवढा बहुमान मिळाला नव्हता, तो विनोद कुलकर्णी यांच्या रुपाने जिल्हयाला प्रथमच मिळाला आहे.

विनोद कुलकर्णी यांनी १३ वर्षापूर्वी मसाप, पुणे शाहुपुरी शाखेची स्थापना करून साहित्य क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबवत अल्पावधतीच त्यांनी मसाप, शाहुपुरी शाखेचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. मराठी भाषा दिन आणि सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाड्मय मंडळ असे उपक्रम सुरू केले. एकदिवसीय साहित्य संमेलन, दोन विभागीय साहित्य संमेलन, युवा नाट्य संमेलन घेतले. शाहुपुरी शाखेने साहित्याच्या व्यासपीठावरून सामाजिक कार्यास मदत देऊन नवीन पायंडा पाडला. मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना जिल्हयातून एक लाख पत्रे पाठवण्याचा उपक्रम राबवला. याबाबत सातत्याने नेत्यांच्या भेटीगाठी, पत्रव्यवहार, पाठपुरावा करूनही काहीच न झाल्याने शाखेने पुढाकार घेऊन थेट दिल्लीत जाऊन साहित्यिक आणि लोकप्रतिनिधींना घेऊन प्रार्थना आंदोलन केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध आणि सन्मानांने व्हावी यासाठी मसापच्या बैठकीत ठराव घेण्याचा प्रस्ताव शाखेमार्फत देण्यात आला. मसाप, पुणेने तो पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. त्याचप्रमाणे नुकतेच कवीवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे नूतनीकरण आणि त्याचे स्मारकात रूपांतर केले आहे. तसेच लवकरच जिल्हयातील विविध मान्यवर साहित्यिकांचे पुतळे, स्मारक उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. आजपर्यंत केलेल्या या कार्याची दखल घेत त्यांची कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या निधनानंतर दीपक करंदीकर, उद्धव कानडे या स्थानिक कार्यवाहांचे झालेलेआकस्मिक निधन हा परिषदेसाठी मोठा धक्का होता. हे तीनही पदाधिकारी सांभाळत असलेले विभाग अतिशय महत्त्वाचे असल्याने व परिषदेचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी त्यांची रिक्त झालेली पदे भरण्याचा विषय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेवर घेण्यात आला. घटनेतील तरतूदीनुसार आणि घटनेने कार्यकारी मंडळाला दिलेल्या अधिकारानुसार या रिक्त झालेल्या जागा भरण्यात आल्या आहेत. बैठकीत विविध महत्वपूर्ण निर्णय आणि इतर रिक्त जागेवर निवडी करण्यात आल्या.

या निवडीवेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, रवींद्र बेडकिहाळ, अ‍ॅड. प्रमोद आडकर, शिरीष चिटणीस, पद्माकर कुलकर्णी, राजन लाखे, कल्याण शिंदे, अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी, तानसेन जगताप, वि. दा. पिंगळे, रावसाहेब पवार, पद्माकर शिरवाडकर, राजन मुटाणे, माधव राजगुरू, सुरेश देशपांडे, सतीश देसाई, जयंत येल्लुकर यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्रभर पदाची उंची वाढवण्याची संधी

मसाप, पुणे या संस्थेत जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर शाहूपुरी शाखेची स्थापना, सातारा जिल्हा प्रतिनिधी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ विश्वस्त, प्रतिनिधी या पदावर टप्प्याटप्प्याने निवड झाली. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या प्रती ठेवलेली निष्ठा आणि केलेले काम यामुळे या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या पदामुळे महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मिळणार असून भविष्यात या पदाची उंची वाढवण्याचे काम करणार आहे.

– विनोद कुलकर्णी

 


Back to top button
Don`t copy text!