आपल्या कामाचा ठसा उमटविणारे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे


कमला निंबकर बालभवन शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे यांची ३१ मार्चला सेवानिवृत्ती, त्याबद्दल…

फलटण येथील कमला निंबकर बालभवन शाळेच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. विश्वास भानुदास जगदाळे हे दि. ३१ मार्च २०२४ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कमला निंबकर बालभवन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. कमला निंबाळकर बालभवनच्या शैक्षणिक विकासामध्ये त्यांनी अतुल्य असे योगदान दिले आहे.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के निकालाची परंपरा त्यांनी आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीत कायम राखली होती. अतिशय शिस्तप्रिय, मितभाषी, चिकित्सक, साधे, सरळ पण अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, संगीत आणि पर्यावरण या सर्वच क्षेत्रावर आपलं प्रभुत्व त्यांनी सिद्ध केले आहे. इतकेच नाही तर त्या त्या क्षेत्रातील अद्यावत माहिती कायम ठेवणारे ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ म्हणून ते तालुक्याच्या व जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. कमला निंबकर बालभवनसारख्या प्रयोगशील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये काम करत असताना आपल्या सहकारी शिक्षकांना सतत मार्गदर्शन त्यांनी केले आहे व अभ्यासात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कायमच आपला जादाचा वेळ देऊन त्यांची तयारी करून घेतली आहे. सर्वच वर्गामध्ये असणार्‍या वंचित, शोषित, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी कायमच त्यांनी विशेष वेळ देऊन त्यांना त्या त्या विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सर्वतोपरी मदत त्यांनी केली आहे.

विश्वास जगदाळे सर यांचे वडील भानुदास जगदाळे सीआरपी व एसआरपीमध्ये होते. पोलीस दलामध्ये असल्यामुळे कायमच वक्तशीरपणा, शिस्त व सर्व समाज बांधवांशी प्रेम, मैत्री, सलोख्याचे संबंध कसे प्रस्थापित करावेत याचे उत्तम बाळकडू त्यांना त्यांचे वडील भानुदास व आई बबई यांच्याकडून मिळाले. घरात एकूण तीन भाऊ व एक बहीण असं मोठं कुटुंब लाभलेल्या सरांनी कायमच आपल्या आई-वडिलांच्या संस्काराचे जतन व संवर्धन करत नीतिमान जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आई-वडील अतिशय सरळ, साधे आणि संविधानिक मूल्ये जपणारे मनमिळावू आणि सर्वांनाच आपलंसं करणारे होते. त्यामुळे स्वत:चा स्वभाव त्यांच्या आईसारखा असल्याचे ते आवर्जून सांगतात. आई-वडिलांनी कधीही, कसलाही भेदभाव केला नाही. ‘सर्व मनुष्य मात्र समान आहेत’, या तत्त्वावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच सरांनी तो विचार आणि वारसा पुढे चालवला आहे.

शिक्षण :

सरांचे प्राथमिक शिक्षण दौंड येथील संत तुकडोजी विद्यालय येथे झाले. इयत्ता दहावीसाठी ते फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूलमध्ये दाखल झाले. ज्युनिअर कॉलेजसाठी सातारच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी वाई येथील किसनवीर महाविद्यालय येथून विज्ञान शाखेतून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. तर बी.एड्. त्यांनी अध्यापक विद्यालय फलटण येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी शालेय व्यवस्थापनामध्ये डिप्लोमा बारामतीच्या शारदानगर येथे पूर्ण केला.

सेवा आरंभ :

आपल्या शैक्षणिक सेवेला त्यांनी १९९१ पासून सुरूवात केली. सुरूवातीला ते फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सोमंथळी येथील हायस्कूलवर ते सेवेत रुजू झाले. त्यांनी तिथे दोन वर्ष अध्यापन केले. १९९३ मध्ये ते कमला निंबकर बालभवन शाळेत उपशिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. बीजगणित, भूमिती, विज्ञान हे त्यांचे अध्यापनाचे विषय होते. याच कमला निंबकर बालभवन शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकपदी २००९ पासून ते सलग १५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्याशी बोलताना आपल्या जीवनातील आनंदाचा व दुःखाचा क्षण सांगताना ते म्हणाले, पहिला निकाल हा शंभर टक्के लागला. त्याचा मनामध्ये आनंद होता; परंतु प्रथम क्रमांक आलेल्या नुरी राजवंशी हिला मात्र इयत्ता दहावीमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण प्राप्त झाले नव्हते. पण, तो एक अनुभव होता. त्यातून खूप काही शिकायला मिळालं.आताची गुणदान पद्धती व त्यावेळची गुणदान पद्धत ही वेगळी होती. आता विद्यार्थ्यांना सहज १०० गुण प्राप्त होत आहेत. त्याकाळी ७०% च्या वरती गुण मिळवणे यासाठी कठोर मेहनत व अभ्यासाची गरज असायची. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्कांपेक्षा त्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर देण्याचा विचार आता पुढे आला आहे.

सहचारिणी :

सरांच्या सहचारिणी सौ. उर्मिला उर्फ अनिता विश्वास जगदाळे यासुद्धा साखरवाडी येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सरांना जेव्हा असं विचारलं की, आपण शाळेसाठी जवळजवळ पूर्ण वेळ देता, एवढा वेळ आपल्याला कसा मिळतो? यावर स्मित हास्य करत अगदी अभिमानाने याचं सर्व श्रेय आपल्या पत्नी सौ. उर्मिला उर्फ अनिता विश्वास जगदाळे यांना ते देतात. कारण सर्व सण, उत्सव, नातेवाईक, विविध कार्यक्रम हे सर्व संस्कार व पाहुणे रावळे या सर्व गोष्ट सौ. उर्मिला उर्फ अनिता विश्वास जगदाळे याच पाहतात. आख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्याच सांभाळतात. त्यामुळे शाळेसाठी पूर्ण वेळ मिळतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या सहचरणी सौ. उर्मिला उर्फ अनिता विश्वास जगदाळे यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्याच खर्‍या अर्थाने आपल्या ‘बॅकबोन’ असल्याचे ते सांगतात.

आवड व छंद :

सरांना वाचनाची प्रचंड आवड असून शाळेतील जवळजवळ सर्वच मासिके ते वाचत असतात. प्रचंड वाचन करतात. त्यांच्या आवडीच्या पुस्तकांमध्ये डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’, ‘महाभारतातील स्त्रिया’, ‘सुभाषचंद्र बोस यांचे आत्मचरित्र’ व वि.स खांडेकर यांची पुस्तके त्यांना विशेष आवडतात.

सर अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. हे कसं? किंवा हे कौशल्य कसे आत्मसात केले, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, आमचे कुटुंब मोठे असल्याने आईला सर्व काम करावे लागत होते. तिच्या कामात मदत म्हणून सुरूवात भांडी घासण्यापासून झाली. पुढे हळूहळू सर्व स्वयंपाक येऊ लागला. आजही आम्ही दोघं नोकरीत असल्यामुळे काही जबाबदार्‍या या स्वतः मी पार पाडत असतो. त्यात स्वयंपाक ही गोष्ट आलीच. तेव्हा त्यात काही लाज वाटून घेण्याचे कारण नाही. उलट त्यातून आनंद मिळतो. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इतकेच आपल्या पत्नीलाही स्थान असल्याचं ते सांगतात.

कला, क्रीडा व संगीत :

या तिन्ही क्षेत्रांची सरांना आवड आहे. ते उत्तम क्रिकेट खेळतात. जुन्या गायकांची गाणी त्यांना आवडतात. एवढेच नाही तर या सर्व क्षेत्रातली अद्यावत माहिती त्यांना असते. जागतिक स्तरावरील खेळल्या जाणार्‍या क्रिकेटच्या विश्वचषकाचे सामने असो, की फुटबॉलचे सामने असो, की विम्बल्डन टेनिस स्पर्धा असो किंवा इतर खेळांचे सामने असो, त्याचे अपडेट घेऊन ते कायम शाळेच्या फळ्यावरती लिहीत असतात. त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करतात. त्यांचे विशिष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या खेळाविषयी ते भरभरून सांगतात.

प्राणीमात्रावर भूतदया :

सरांचा हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. कधीही त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यामध्ये वावरणारी ही मांजर मंडळी जणू घराचे मालकच आहेत, या अविर्भावात मिरवतात. त्यांच्यावर सरांचे पुत्रवत्त प्रचंड प्रेम आहे. तीपण सरांचा किंवा सरांच्या गाडीचा आवाज ऐकल्यानंतर दारामध्ये तयारच असतात. प्रत्येकाचा आवाज ओळखून प्रत्येकाला काय हवं आहे, हे सरांना बरोबर माहीत होतं. आपल्या परिसरातील मोकाट कुत्र्यांसाठी बिस्किट ते नियमित टाकतात. एखाद्या वाहनाखाली चिरडून एखाद्या मांजर किंवा कुत्र्याचा जीव गेला तर अक्षरशः ते खूप हळवे होऊन जेवणही करत नाहीत. असे प्रचंड प्रेम ते प्राणीमात्रांवर करतात.

आजची शिक्षण पद्धती :

आजच्या शिक्षण पद्धतीविषयी बोलताना ते म्हणाले, ‘पद्धत कोणतीही असो, पण त्यात मागे राहणार्‍या मुलांसाठी उपचारात्मक घेण्याची तरतूद असावी. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यावे, तशी सोय प्रत्येक शाळेमध्ये असावी. नुसत्या पाठांतरावर भर नसावा. मुलांना शिक्षणातून आनंद मिळाला पाहिजे व त्याचप्रमाणे त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणही मिळालं पाहिजे, अशी शिक्षण पद्धती आवश्यक आहे.

राजकारण आणि समाजकारण :

या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण व्यक्ती म्हणूनही आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत या दोन्हीमधील विचार पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आपली आहे. जागतिक स्तरावर घडणार्‍या घटनांची माहिती आपल्याला असायला हवी. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जग जास्त जवळ आले आहे. तेव्हा आपणही स्वतःला अद्यावत ठेवण्याची गरज आहे. चांगली माणसं राजकारणात यायला हवीत. त्यांनी संविधानिक मूल्यांचा अंगीकार करून समाजकारणावर व विधायक विकासावर भर द्यायला हवा. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची माहिती ते कायम फळ्यावरती लिहीत असतात. यासंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा घडवून आणतात.

आपल्या सर्व सहकार्‍यांप्रती कृतज्ञता

आपल्या कमला निंबकर बालभवन शाळेतील सेवेमध्ये ज्यांनी आपल्यावर प्रचंड विश्वास दाखवला त्या डॉ. मॅक्सिम बर्नसन म्हणजेच आपल्या सर्वांच्या मॅक्सिन मावशी, प्रगत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष तथा विश्वस्त डॉ. मंजिरी निंबकर म्हणजेच आपल्या मंजूताई, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी साहेब, संस्थेचे सर्व विश्वस्त, डॉ. चंदा निंबकर, माझे सहकारी शिक्षक समन्वयक, संस्थेच्या सचिव मधुरा राजवंशी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी सावंत, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले, आपली शाळा बालवाडी विभाग, कमला निंबकर बालभवन बालवाडी विभाग व प्राथमिक, माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक सहकारी, ऑफिस स्टाफ, प्रगत शिक्षण संस्थेच्या लातूर विभागाचे प्रकल्प अधिकारी सोमिनाथ घोरपडे सर, माझे सर्व प्रिय आजी-माजी विद्यार्थी या सर्वांचा माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्या सर्वांच्या बरोबर काम करताना मला प्रचंड आनंद, आत्मविश्वास आणि प्रेम मिळाले. ते मी विसरू शकत नाही. मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील तालुका व जिल्हा स्तरावरील प्रशासकीय अधिकारी व सर्व शिक्षक मित्र या सर्वांचे प्रेम मला मिळाले. इथून पुढेही ते मिळत राहील, अशा भावना सरांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्याध्यापक विश्वास जगदाळे यांना पुढील वाटचालीसाठी व उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

– श्री. सोमिनाथ पोपट घोरपडे,
प्रकल्प अधिकारी,
प्रगत शिक्षण संस्था फलटण,
उपकेंद्र – औसा, लातूर


Back to top button
Don`t copy text!