अखेर रणशिंग फुंकले; जिल्हा परिषद-पंचायत समितीचा ‘धुराळा’ ५ फेब्रुवारीला उडणार! आचारसंहिता लागू; उमेदवारी अर्जासाठी ‘ऑफलाईन’चा धक्का


राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ‘ऑफलाईन’ असणार आहे. वाचा संपूर्ण वेळापत्रक…

स्थैर्य, फलटण, दि. १३ जानेवारी : ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल आज अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, आजपासूनच संपूर्ण जिल्ह्यात ‘आदर्श आचारसंहिता’ (Code of Conduct) लागू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अत्यंत वेगाने हालचाली करत आयोगाने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानाचा दिनांक निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे ‘ऑफलाईन’ (Offline) असणार आहे, हा इच्छकांसाठी मोठा आणि महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

निवडणुकीचा ‘हायव्होल्टेज’ कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इच्छुकांना १६ जानेवारीपासून अर्ज भरता येणार आहेत. अवघ्या ५ दिवसांत अर्ज भरावे लागणार असल्याने इच्छुकांची मोठी धावपळ उडणार आहे. या निवडणुकीसाठी ०१ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेली अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

असा असेल संपूर्ण निवडणूक कार्यक्रम:

  • अर्ज भरण्यास सुरुवात: १६ जानेवारी २०२६
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २१ जानेवारी २०२६
  • अर्जांची छाननी (Scrutiny): २२ जानेवारी २०२६
  • अर्ज माघारी घेण्याची मुदत: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० वाजता)
  • मतदानाचा दिवस: ०५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३०)
  • मतमोजणी व निकाल: ०७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजता)

‘ऑफलाईन’ अर्जांमुळे चुरस वाढणार

साधारणपणे निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन असते, मात्र यावेळी आयोगाने संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘ऑफलाईन’ ठेवली आहे. यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नसला तरी, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि प्रत्यक्ष रांगा यामुळे तहसील कार्यालयात मोठी गर्दी उसळणार आहे.

फलटणमध्ये राजकीय वातावरण तापले

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच फलटण तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्याने आता शासकीय कामांना ब्रेक लागला असून, आता फक्त ‘प्रचाराचा तोफखाना’ धडाडणार आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारणार आणि ७ फेब्रुवारीला गुलाल कोण उधळणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!