
दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण भारतात साजरा होत आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. जि.प.प्राथ.शाळा वडगाव नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करत असते. यावेळी वडगाव शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात सरांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे निमित्त साधून ६० फूट भारताचा भव्य असा नकाशा असलेली रांगोळी रेखाटली होती. यासाठी त्यांना शाळेचे सहशिक्षक सोपान मोटे सर व शिक्षिका अश्विनी राऊत मॅडम यांनी मदत केली.
सदरची भव्य रांगोळी पाहून उपस्थित सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांच्यात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. या नकाशाभोवती सर्व विद्यार्थ्यांना उभे करून स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहन घेण्यात आले. सदरचे ध्वजारोहन स्वातंत्र्यदिनादिवशीच ७७ वा वाढदिवस साजरा करणारे गावचे जेष्ठ नागरीक श्री. बुवा ओंबासे यांच्या हस्ते झाले.
वडगावचे सरपंच श्री. अजिनाथ ओंबासे , दहिवडी केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण आवळे साहेब , शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच इतर प्रतिष्ठीत नागरीक यांनी तिरंगा ध्वज हातात घेवून विविध घोषणा देत नकाशाभोवती धावत फेरी मारून विद्यार्थ्यांना देशप्रेमाचा संदेश दिला.