फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी अर्जांची पाटी कोरीच; ऑनलाईन प्रक्रियेमुळे ऑफलाईन विक्री बंद


स्थैर्य, फलटण, दि. १० नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, आज पहिल्या दिवशी सर्व प्रभागांमध्ये मिळून एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्जांची पाटी कोरीच राहिली.

यावर्षी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. त्यामुळे नगरपरिषद कार्यालयात अर्जांची ऑफलाईन विक्री बंद करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरावे लागणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामकाज सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व इच्छूक उमेदवार आणि राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवारांना घरबसल्या किंवा सुविधा केंद्रावरून अर्ज भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखील जाधव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आज अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवार याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छूक उमेदवार पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. एकदा याद्या जाहीर झाल्या की अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

निवडणूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला असला तरी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून दक्षता घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

आगामी काही दिवसांत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल आणि राजकीय हालचालींना वेग येईल. तोपर्यंत प्रशासन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!