स्थैर्य, दि.२१: युटय़ूब हा अतिशय लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे.कुणीही व्हिडिओ बनवला आणि युटय़ूबवर अपलोड केला की क्रिएटरला पैसे मिळतात. ज्यांच्या व्हिडिओंवर जाहिराती दिसतात त्यांनाही जाहिरातीतून मिळणाऱया महसुलाचा हिस्सा मिळतो. पण आता युटय़ूबने आपल्या धोरणात बदल केलाय. यापुढे क्रिएटर्सच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवल्यानंतरही त्यांना पैसे मिळणार नाहीत. समस्त युटय़ूब व्हिडियो क्रिएटर्ससाठी हा मोठा झटका आहे.
आतापर्यंत कोणत्याही युटय़ूब व्हिडिओवर जाहिराती दिसायच्या आणि त्या बदल्यात क्रिएटरला पैसे दिले जात होते. पण आता असे होणार नाही. युटय़ूब पार्टनर प्रोग्रॅमचा भाग नसल्यामुळे जोपर्यंतच क्रिएटर्स आपले चॅनेल मॉनिटाईज करत नाहीत, तोपर्यंत त्यांना महसूल मिळणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केलं आहे.
– युटय़ूब पार्टनर प्रोग्रॅमचा भाग बनण्यासाठी एखाद्या क्रिएटरचे किमान एक हजार सबस्क्राईबर्स असायला हवेत. तसेच 12 महिन्यांच्या आत व्हिडियोला चार हजार तासांचा वॉचटाईम असायला हवा.
– गुगल कंपनीने युट्युबचे नवीन अपडेट अमेरिकेत रोलआऊट केले आहेत जगभरातील अन्य मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने पुढील वर्षअखेरपर्यंत नवे नियम लागू होणार आहेत. परिणाम अनेक छोटय़ा क्रिएटरला फटका बसू शकतो.