दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । फलटण । समाजात दुही, अशांतता, धार्मिक वैमनस्य, द्वेष या माध्यमातून सामाजिक सलोख्याला धक्का पोचत असेल तर कायद्याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना समाजप्रबोधनाची जबाबदारी एक कर्तव्य म्हणून द्यावी लागेल. त्यासाठी आजच्या तरुणांपुढे धर्म की भाकरी, हिंदुत्त्व की भारतीयत्त्व हे आव्हान असून त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणांनी यावर सकारात्मक विचार करावा व राष्ट्रीय, सामाजिक एकात्मता जपावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
येथील प्रियदर्शिनी ज्ञानप्रबोधन संस्थेच्या विधी महाविद्यालयात आयोजित शिक्षकदिन व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अॅड.रमेशचंद्र (नाना) भोसले होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांची सन्माननीय उपस्थिती होती.
कायद्याचं शिक्षण घेणार्यांनी समाजातल्या विविध आव्हानांचा, समस्यांचा अभ्यास केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन बेडकिहाळ म्हणाले, ‘‘न्यायदानाच्या प्रक्रियेत ‘न्याय’ विकत घ्यावा लागतो, अशी पैशावर आधारित व्यवस्था स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अस्तित्त्वात आहेच. आपल्याकडे येणारा पक्षकार भयमुक्त समाजव्यवस्थेतील न्यायाच्या अपेक्षेने येत असतो. पण पैशाच्या, सत्तेच्या जोरावर अशी समाजव्यवस्था असेलच असे नाही. तसेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरची लोकशाही लोकांना जबाबदार असण्यापेक्षा धर्म व व्यक्ती केंद्रित होत आहे.’’
‘‘भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही देणगी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे, पण या व्यवस्थेलाच सत्ताधिष्ठीत बहुमताच्या आधारे छेद दिला जात आहे; ही धोक्याची घंटा आहे व कायद्याच्या विद्यार्थ्यांनी समाजात यावर भयमुक्त प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे’’, असेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले. ‘‘तरुणांनी धर्म की भाकरी यातून भाकरी व हिंदुत्त्व की भारतीय यातून भारतीयत्त्व याची निवड करुन लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद समाजात रुजवावा’’, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी शिक्षकदिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यावतीने निवृत्त समाजशास्त्र प्राध्यापिका जयश्री जोशी यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.रमेशचंद्र भोसले व प्रमुख पाहुणे रविंद्र बेडकिहाळ, प्रा.रमेश आढाव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील अन्य प्राध्यापकांचाही विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व प्रा.अशोक शिंदे यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
‘‘लोकशाहीमधील चार स्तंभामध्ये न्यायव्यवस्था हा प्रमुख स्तंभ आहे’’, असे आपल्या भाषणात सांगून प्रा.रमेश आढाव म्हणाले, ‘‘हा स्तंभ लोकशाहीला पूरक राहील असे योगदान कायदा पदवीधरांनी द्यावे. समाजातील गरजू लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न करावेत व लोकशाही संरक्षणासाठी हातभार लावावा’’, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, बॅ.राजाभाऊ भोसले यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या महाविद्यालयाची वाटचाल स्पष्ट करुन अॅड.रमेशचंद्र भोसले म्हणाले, ‘‘फलटण तालुक्यात या महाविद्यालयाची उणीव होती ती भरुन निघाली आहे. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उत्तम वकील, न्यायाधीश व कायदा सल्लागार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाचा लौकिक वाढला आहे.’’
सेवानिवृत्त प्रा.जयश्री जोशी व प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थी प्रतिनिधी संदीपकुमार जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड.प्रा.अमित मोरे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले.