दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । फलटण । एम.पी.एस.सी. तसेच बॅंकींगच्या परिक्षेच्या माध्यमातुन अधिकारी झालेल्यांचा आदर्श भाडळी बु.आणि पंचक्रोशीतील युवकांनी घ्यावा असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.
भाडळी बु.येथील जाणता राजा प्रतिष्ठान, नेहरु युवा मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने गावची सुकन्या कु. कोमल डांगे ही आर.टी.ओ. परिक्षा उत्तीर्ण झाली तसेच गावचे सुपुत्र चि. यश ठोंबरे हा एम.बी.बी.एस. साठी पात्र झाला त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. केवळ परिस्थितीचे भांडवल न करता चिकाटी आणि मेहनत करुन यश संपादन केले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, आरबीआय येथील सहाय्यक व्यवस्थापक शुभम डांगे, पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे संचालक एम. एस. गुंजवटे, शिक्षक नेते सुभेदार डुबल, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशीकांत सोनवलकर, पोलीस पाटील हनुमंत सोनवलकर, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी यथोचित मनोगत व्यक्त करुन यशस्वीतांना शुभेच्छा दिल्या.
कु.कोमल डांगे आणि चि. यश ठोंबरे यांनी सत्काराला उत्तर देताना गावातील युवकांना सर्वतोपरी सहकार्य, मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले आणि आयोजकांचे आभार मानले.
यावेळी यशस्वीतांच्या पालकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाडळी बु. चे ग्रामपंचायत कर्मचारी धर्मेंद्र शिरतोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी भाडळीतील आजी माजी सैनिक, पदाधिकारी तसेच प्रतिष्ठान आणि नेहरु युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मोहनराव डांगे यांनी केले. ह.भ.प. राहुलनाना शेंडे यांनी आभार व्यक्त केले.