दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । सातारा । दोन दुचाकी व एक चारचाकी अल्टो कार याचा तिहेरी अपघात होवून युवकाचा मृत्यू झाला. केतन यशवंत लेंभे, पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवार,दि. २0 रोजी सायंकाळी ६ वा. आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत घडलीे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथील केतन यशवंत लेंभे वय २५ आणि जय उत्तम भोईटे वय २२ आदर्की बुद्रुक ता. फलटण हे दोघेही शनिवारी सकाळी आपल्या व्यक्तीगत कामानिमित्त सातारा येथे आले होते. त्यानंतर ते पिंपोडे बुद्रुक येथील गावी दुचाकी क्र. एमएच ११ सीझेड ५५८१ वरुन जात होते. दरम्यान, आरळे येथील अभिषेक नर्सरीनजिक येताच फलटण येथून सातारा शहराकडे येणाऱ्या चार चाकी अल्टो कारने वेगात येत दुचाकीला कट मारला असे दुचाकीवरील जय भोईटे यांनी सांगितले. ही चारचाकी क्षणात निघून गेल्याने नंबर समजला नाही, याचवेळी दुचाकीवरील वेग नियंत्रण करताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोर जाणाऱ्या दुचाकीवर ही गाडी धडकली. यामध्ये दोघेही जण गंभीररित्या जखमी झाले. यानंतर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान केतन यशवंत लेंभे याचे निधन झाले. तर जय भोईटे याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे.
केतन यशवंत लेंभे हा अभियांत्रिकी विद्यालयातून पदवी पूर्ण करुन पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. गावी आल्यानंतर ही घटना घडली. केतनच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. केतन याचे वडील यशवंत यांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. एकुलता एक असणाऱ्या केतनच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास पो.उप. निरीक्षक जाधव या करत आहेत.